लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : लॉकडाऊन नियमांचे उल्लंघन करून नाष्टा सेंटर सुरू ठेवल्याबद्दल चांदणी चौकातील ओम शक्ती केटरर्सला सील ठोकण्यात आले. महापालिका आणि पोलिसांच्या संयुक्त पथकाने शुक्रवारी ही कारवाई केली आहे.
चांदणी चौकातील दामाणी हायस्कूलच्या पिछाडीस असणाऱ्या ओम शक्ती केटरर्समध्ये काही ग्राहक बसून नाष्टा करीत असल्याची माहिती विश्रामबाग पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक अमितकुमार पाटील यांनी मिळाली होती. त्यांनी महापालिकेच्या पथकाला याबाबत माहिती दिली. महापालिकेचे सहायक आयुक्त एस. एस. खरात, वरिष्ठ स्वच्छता निरीक्षक अविनाश पाटणकर, प्रमोद कांबळे, चंद्रकांत जाधव, स्वच्छता निरीक्षक राजू गोंधळे, प्रणिल माने, पंकज गोंधळे आदींसह विश्रामबाग पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचाऱ्यांनी नाष्टा सेंटरची तपासणी केली. यावेळी काही ग्राहक नाष्टा करीत असल्याचे आढळून आले. लाॅकडाऊनमध्ये हाॅटेल, नाष्टा सेंटर बंद असताना ओम शक्ती केटरर्समध्ये मात्र ग्राहकांना सेवा दिली जात होती. नियमांचे उल्लंघन केल्याचा ठपका ठेवत महापालिका व पोलीस पथकाने हे सेंटर सील केले.