सांगली : कोरोनामुळे गेल्या दीड वर्षापासून शाळा बंद असल्यामुळे ऑनलाईन शाळा सुरु आहेत. काही विद्यार्थ्यांचे तर ऑनलाईनही शिक्षण पूर्ण घेतले नाही, तरीही संस्था चालकांनी पालकांकडून ८५ ते १०० टक्केपर्यंत शुल्क वसुली केली आहे. संस्थांच्या या भूमिकेवर पालकांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. कोरोनाचे कारण देत काही संस्था चालकांनी शिक्षकांच्या पगारात कपात केली आहे.
मार्च २०२० ते आजअखेर सर्वच शाळा ऑनलाईन सुरु आहेत. जिल्हा परिषद, नगरपालिका आणि महापालिकेच्या काही शाळांमध्ये तर ऑनलाईनही शिक्षण होत नाही, असा पालकांचा आरोप आहे. खासगी आणि विनाअनुदानित शाळांमध्ये ऑनलाईन शिक्षण चालू आहे. किरकोळ संस्था चालक ५० टक्के शुल्क घेऊन विद्यार्थ्यांना शिक्षण देत आहेत. पण, सांगली, मिरज शहरातील काही नामांकित शिक्षण संस्था चालकांनी ८५ ते १०० टक्के शुल्क पालकांकडून वसूल केले आहे. पालकांनी विरोध करुनही त्यांनी दाद दिली नाही. शुल्क न देणाऱ्या विद्यार्थ्यांना ऑनलाईन शिक्षण बंद करण्याची धमकीही काही शाळा देत आहेत, असा पालकांचा आरोप आहे.
कोट
ऑनलाईन शिक्षण देण्यासाठी शिक्षकांची गरज लागतेच. शाळा बंद असल्यामुळे शिक्षकांचे पगार देण्याचे थांबवून चालत नाही. यामुळे खासगी शाळा विद्यार्थ्यांकडून ५० टक्केच शुल्क घेत आहेत. शासनाने शिक्षकांचे पगार दिले तर तेही शुल्क आम्ही घेणार नाही.
-रावसाहेब पाटील, जिल्हाध्यक्ष, शिक्षण संस्था चालक संघटना.
कोट
अनुभवी शिक्षक असल्यामुळे शाळा बंदचे कारण देऊन त्यांचे वेतन बंद करता येत नाही. पुन्हा चांगले शिक्षक मिळत नाहीत. म्हणूनच सवलत देऊन पालकांकडून शुल्क घेत आहे. कुणावरही शंभर टक्के शुल्क भरण्याची सक्ती केली नाही.
-तात्यासाहेब पाटील, शिक्षण संस्था चालक
चौकट
जिल्हा परिषद शाळा : १६८८
महापालिका शाळा : ५०
खाजगी अनुदानित शाळा : १५२
खासगी विनाअनुदानित शाळा : २२२
चौकट
ऑनलाईनमुळे शाळांचा ५० टक्के खर्च बचत
कोरोनामुळे ऑनलाईन शिक्षण गेल्या दीड वर्षापासून चालू आहे. यामुळे शाळांचा जवळपास ५० टक्के खर्च बचत झाला आहे. एकच शिक्षकांच्या ऑनलाईन तासासाठी तीन तुकड्यांची मुलं हजर आहेत. अनेक शिक्षकांना कायमची सुट्टी दिली आहे. शाळाच बंद असल्यामुळे शाळांचा अन्य कोणताही खर्च होत नाही. या पार्श्वभूमीवर शाळांनी आपला खर्च ५० टक्केमध्ये बसविण्याची गरज आहे. परंतु, अनेक संस्था ७५ टक्क्यांपर्यंत शुल्क वसूल करत असून त्यांच्यावर कारवाईची मागणी पालकांनी केली आहे.
कोट
कोरोनामुळे सर्वच पालक आर्थिक अडचणीत आहेत. या पालकांना शिक्षण संस्था चालकांनी दिलासा देण्याऐवजी ८५ ते १०० टक्के शुल्क वसुलीची सक्ती केली जात आहे. ती पूर्ण चुकीची असून याबाबत शासनाने योग्य तो मार्ग काढण्याची गरज आहे.
-लक्ष्मण जाधव, पालक.
कोट
शाळा तर बंदच आहेत. तसेच ऑनलाईन शिक्षणामुळे संस्थाचालकांचा खर्च कमी झाला आहे. तरीही शाळांकडून ८५ टक्क्यांपर्यंत शुल्क वसुली होत आहे. याबाबत अधिकाऱ्यांकडे तक्रार करुनही संस्था चालक शुल्क वसुलीसाठी विद्यार्थ्यांना त्रास देत आहेत.-मधुकर पाटील, पालक.