जयवंत आदाटे -जत तालुक्यातील शालेय पोषण आहार घोटाळाप्रकरणी कवठेमहांकाळ पोलिसांनी जत येथील बावीस शाळांतील मुख्याध्यापक व संबंधित शिक्षक यांना सर्व कागदपत्रांसह समक्ष बोलावून घेऊन चौकशी केली आहे. या कारवाईमुळे जत पंचायत समिती शिक्षण विभागात खळबळ माजली आहे. त्यामुळे गट शिक्षण अधिकारी संजय जावीर आणि येथील सर्वच विस्तार अधिकारी संशयाच्या भोवऱ्यात सापडले आहेत.नागज फाटा (ता. कवठेमहांकाळ) येथे २७ आॅगस्ट २०१५ रोजी रात्री आठ वाजण्याच्या दरम्यान जतहून भिवघाटकडे जात असलेल्या पाच टेम्पोंची कवठेमहांकाळ पोलिसांनी तपासणी केली होती. यावेळी पन्नास किलो वजनाची असलेली बावीस तांदूळ पोती त्यांना सापडली होती. या तांदळाची आवश्यक असणारी कागदपत्रे त्यांच्याकडे त्यावेळी मिळाली नाहीत. त्यामुळे पोलिसांनी पोलिसी खाक्या दाखवून टेम्पो चालकांकडे अधिक चौकशी केली असता, हा तांदूळ जत तालुक्यातील शालेय पोषण आहार योजनेतील आहे, मुख्याध्यापक व शिक्षक यांना कमी वजन असलेली पोती देऊन प्रत्येक पोत्यामधून कमी-जास्त प्रमाणात तांदूळ काढून घेऊन त्यातून जमा झालेला बावीस पोती तांदूळ आम्ही परत घेऊन जात आहोत, हा तांदूळ आम्ही इतर ठिकाणी विक्री करतो, अशी माहिती त्यांनी कवठेमहांकाळ पोलिसांना चौकशीदरम्यान दिली आहे.पोलिसांनी या जुजबी माहितीच्या आधारे जत तालुक्याच्या पूर्व भागातील एकूण बावीस जिल्हा परिषद कन्नड व मराठी प्राथमिक शाळा आणि खासगी महाविद्यालयातील मुख्याध्यापक आणि संबंधित शिक्षकांची कवठेमहांकाळ पोलीस ठाण्यात प्रत्यक्ष बोलावून घेऊन चौकशी केली आहे. यावेळी शालेय पोषण आहार योजनेशी संबंधित कागदपत्रांची तपासणीही करण्यात आली आहे, असे समजते. वज्रचौंडे (ता. तासगाव) येथून जत तालुक्यासाठी शालेय पोषण आहाराचा तांदूळ पुरविला जात आहे. शाळेतील उपस्थित विद्यार्थ्यांच्या प्रमाणात तांदूळ शिजवून त्याचे वाटप करण्यात येत आहे. परंतु मुले भात खात नाहीत. गैरहजर असणाऱ्या विद्यार्थ्यांची उपस्थितीही लावली जाते. यामुळे तांदूळ जादा शिल्लक राहतो. प्रत्येक महिन्यात शिल्लक राहिलेला तांदूळ एकत्र करून तो नव्याने आला आहे, असे काही मुख्याध्यापक कागदोपत्री दाखवतात व नव्याने टेम्पोतून आलेला तांदूळ टेम्पो चालकाला विकत आहेत, ही खरी वस्तुस्थिती आहे.परंतु टेम्पोचालकाने मुख्याध्यापकांना वाचविण्यासाठी चुकीची माहिती कवठेमहांकाळ पोलिसांना दिली आहे. शालेय पोषण आहार घोटाळा प्रकरणात मुख्याध्यापक व टेम्पोचालक आणि ठेकेदार यांची साखळी कार्यरत आहे. पोलिसांनी सखोल चौकशी केल्यास त्यांचे पितळ उघडे पडणार आहे.वेळोवेळी तपासणी... तरीही अपहारएकुंडी (ता. जत) जिल्हा परिषद येथील मराठी प्राथमिक शाळेतील शिक्षक आप्पासाहेब बापू लंगोटे यांनी अशाचप्रकारे शिल्लक सात क्विंटल तांदूळ गावातील एका पोल्ट्री चालकाला विकला होता. ग्रामस्थांनी यासंदर्भात तक्रार केल्यानंतर वरिष्ठ अधिकाऱ्यांनी त्यांची खातेनिहाय चौकशी केली. चौकशीत ते दोषी आढळून आल्यामुळे त्यांच्यावर निलंबनाची कारवाई प्रशासनाने केली आहे.जत पंचायत समिती गटशिक्षणाधिकारी आणि विस्तार अधिकारी वेळोवेळी शाळांची तपासणी करतात. तरीही त्यांना शालेय पोषण आहार योजनेतील घोटाळा का सापडत नाही?, असा प्रश्न नागरिकांतून उपस्थित केला जात आहे. त्यांचा या घोटाळ्यात सहभाग असल्यामुळे संबंधित या अपहाराकडे जाणूनबुजून कानाडोळा करीत आहेत काय? अशी कुजबूज आता सुरू झाली आहे. नागज फाटा (ता. कवठेमहांकाळ) येथील घटनेशी जत तालुक्यातील शाळांचा कोणताही संबंध नाही. सर्वच मुख्याध्यापकांनी रेकॉर्ड अद्ययावत ठेवले आहे. परंतु पोलिसांनी येथील मुख्याध्यापकांना बोलावून घेऊन चौकशी का केली ते समजून येत नाही. आम्ही नियमित शाळा तपासणीबरोबर शालेय पोषण आहार कागदपत्रांची तपासणी करीत आहोत.- संजय जावीर, गटशिक्षणाधिकारी, जतसंगनमताने अपहारकवठेमहांकाळ पोलिसांनी नागज फाटा येथे पकडलेला तांदूळ टेम्पो चालकांनी वजनात कमी देऊन प्रत्येक पोत्यातून काढलेला तांदूळ नसून, मुख्याध्यापक आणि टेम्पोचालक यांच्या संगनमताने केलेला हा अपहार आहे, अशी चर्चा होत आहे.
‘शालेय पोषण’च्या चौकशीचा ससेमिरा सुरू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: September 17, 2015 23:45 IST