सांगली : कोरोना रुग्णांचे प्राण वाचविण्यासाठी अहोरात्र औषध पुरवठा करणाऱ्या औषध विक्रेत्यांकडे शासनाने दुर्लक्ष केल्याची तक्रार केमिस्ट ॲन्ड ड्रगिस्ट असोसिएशनने केली आहे. कोविड योद्धे म्हणून दर्जा दिला नाही तर आम्हीदेखील लॉकडाऊनमध्ये सहभागी होऊ, असा इशारा संघटनेने दिला आहे.
संघटनेचे अध्यक्ष जगन्नाथ शिंदे यांनी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे की, कोरोनाच्या पहिल्या लाटेपासून औषध विक्रेते सक्रिय आहेत. डॉक्टर आणि पोलिसांच्या खांद्याला खांदा लावून प्राणदायी औषधांचा पुरवठा करत आहेत. हजारो कोरोना रुग्णांचे प्राण वाचवताना स्वत: मात्र कोरोनाचे बळी ठरत आहेत. गेल्या वर्षभरात राज्यभरात २००हून अधिक औषध विक्रेते कोरोनाचे बळी ठरले. त्यांच्यावर अवलंबून असणारे एक हजारहून अधिक परिवार यामुळे रस्त्यावर आले आहेत. केंद्र सरकारने त्यांच्याकडे दुर्लक्ष केले आहे.
औषध विक्रेत्यांना कोविड योद्धे म्हणून घोषित करावे, यासाठीही संघटना सातत्याने सरकारबरोबर पत्रव्यवहार करत आहे, मात्र त्याकडे सरकारने कानाडोळा केला आहे. कोरोनाच्या लसीकरणामध्येही प्राधान्य दिलेले नाही. जिवाची जोखीम घेऊन व्यवसाय सुरु आहे. सरकारच्या उदासीन दृष्टीकोनामुळे संघटनेवर औषध विक्रेत्यांचा दबाव वाढत आहे. त्यामुळे औषध विक्रेतेही लाॅकडाऊनमध्ये सहभागी होण्याच्या मानसिकतेत आहेत. सरकारने वेळीच लक्ष दिले नाही, तर औषध विक्रेते दुकाने बंद ठेवतील, असे शिंदे यांनी म्हटले आहे.