सांगली : जिल्हा परिषदेच्या निवृत्त प्राथमिक शिक्षकांची निवृत्तीवेतनाविना ससेहोलपट सुरू आहे. गेल्या वर्षभरात एकदाही महिन्याच्या पहिल्या आठवड्यात मिळालेले नाही.
वृद्धापकाळात पूर्णत: निवृत्तीवेतनावर अवलंबून असलेले शिक्षक बँकांत हेलपाटे मारत आहेत. गेल्या वर्षी लॉकडाऊन सुरू होताच निवृत्तीवेतनात विलंब सुरू झाला. सुरुवातीला प्रत्येक महिन्याच्या १० ते १५ तारखेपर्यंत मिळत होते. नंतर मात्र तिसऱ्या आठवड्यापर्यंत लांबले. नोव्हेंबर-डिसेंबरमध्ये तर शेवटच्या दोन-तीन दिवसांत मिळू लागले. जानेवारीपासून तर भरवसाच राहिलेला नाही. फेब्रुवारी महिन्याचे निवृत्तीवेतन मार्च संपला तरी मिळालेले नव्हते. अधिकारी मार्चअखेरची कारणे सांगत होते. शासनाने बहुतांश निधी कोरोनामुळे आरोग्य यंत्रणेकडे वळविल्याने निवृत्तीवेतन रखडल्याचे सांगत होते.
निवृत्त शिक्षकांनी सांगितले की, वृद्धापकाळातील औषधपाणी, प्रवास, कौटुंबिक खर्च यासाठी निवृत्तीवेतनाशिवाय पर्याय नाही. कुटुंबापासून स्वतंत्र राहणाऱ्या शिक्षकांचे तर अत्यंत वाईट हाल सुरू आहेत.