मिरज : मिरजेत मीरासाहेब दर्गा उरूसानिमित्त आयोजित संगीतरत्न अब्दुल करीम खाँ संगीत सभेत दुसऱ्या दिवशी दिग्गज गायक व वादकांनी सतार, तबला, सरोद, शहनाईवादन व शास्त्रीय गायनाच्या विविध स्वरछटांनी श्रोत्यांची दाद मिळविली. पहाटे पाच वाजेपर्यंत रंगलेल्या या संगीत सभेस मोठ्या संख्येने श्रोते उपस्थित होते. संगीत सभेच्या दुसऱ्या दिवसाची सुरुवात शैलेश भागवत (ठाणे) यांच्या शहनाईवादनाने झाली. त्यांनी राग शंकरा सादर केला. त्यांना रत्नश्री यांनी तबलासाथ केली. उषा देशपांडे (मुंबई) यांचे शास्त्रीय गायन झाले. देशपांडे यांनी राग बागेश्री आळविला. सुचिता आठलेकर (मुंबई) यांचेही गायन झाले. त्यांनी राग जोग गायिला. माधव मोडक, संदीप तावरे यांनी तबला व हार्मोनियमसाथ केली. रश्तीस्लाव जनार्दन (दिल्ली) यांनी सतारीवर राग बिहाग सादर केला. मकरंद तुळाणकर यांनी समर्पक तबलासाथ केली. जयेश रेगे (मुंबई) यांच्या सोलो तबलावादनास रसिकांची दाद मिळाली. त्यांनी ताल त्रिताल सादर केला. संदीप तावरे यांनी लेहरासाथ केली. राजन कुलकर्णी (पुणे) यांनी सरोदवादन केले. त्यांनी राग पुरीया कल्याण सादर केला. त्यांना मकरंद तुळाणकर यांनी तबलासाथ केली. परितोष पोहनकर (मुंबई) यांनी गायन केले. त्यांनी राग दरबारी आळविला. मकरंद तुळाणकर, अनंत केमकर यांनी तबला व हार्मोनियम साथ केली. मन्सूर खान (गोवा) यांनी सतारवादन केले. त्यांनी राग नटभैरव सादर केला. प्रसाद सुतार यांनी तबलासाथ केली. उमेश चौधरी (नवी मुंबई) यांनी राग अहिरभैरव आळविला. (वार्ताहर)
सरोद, सतार व तबलावादनाने मैफलीला साज
By admin | Updated: May 18, 2015 01:02 IST