कुपवाड : शहरातील मुख्य रस्त्यालगत असलेल्या ओंकार फर्निचर व खारे मळ्यातील भाग्यश्री ट्रेडर्स या किराणा दुकानातील २६ हजार रुपयांच्या चोरीप्रकरणी कुपवाड पोलिसांनी सराईत गुन्हेगारास अटक केली आहे. बापू दिलीप काळे (वय ३०, रा. वाल्मिकी आवास, सांगली) असे अटक केलेल्या संशयिताचे नाव आहे.
मंगळवारी (दि. १०) मध्यरात्री संशयित चोरट्याने प्रथम खारे मळ्यातील भाग्यश्री ट्रेडर्स किराणा दुकानाच्या डाव्या बाजूचा पत्रा कापून आत प्रवेश केला. किराणा दुकानातील रोख २० हजार रुपयांची चोरी केली; तर ओंकार फर्निचर या दुकानाच्या डाव्या बाजूचा पत्रा कापून दुकानातील रोख एक हजार २०० रुपये व मोबाईल, चार्जर, पाॅवर बँक असा ऐवज लंपास केला होता. पोलिसांनी तातडीने संशयिताचा शोध घेऊन त्याला अटक केली. त्याचा आणखी एक साथीदार फरार आहे. पोलीस त्याचा शोध घेत आहेत. सराईत बापू काळे याला पोलिसांनी मिरजेतील न्यायालयात उभे केले असता त्याला पाच दिवस पोलीस कोठडी सुनावण्यात आली.
चौकट :
काळे रेकाॅर्डवरील गुन्हेगार
संशयित काळे हा रेकॉर्डवरील गुन्हेगार आहे. त्याच्याविरोधात कुपवाड, विश्रामबाग, सांगली शहर, मिरज शहर, इचलकरंजी, सातारा जिल्ह्यातील रहिमतपूर या पोलीस ठाण्यांत चोरीबरोबरच गंभीर स्वरूपाचे इतर गुन्हे दाखल आहेत, अशी माहिती साहाय्यक निरीक्षक नीरज उबाळे यांनी दिली.