भिलवडी : तासगाव तालुका सहकारी साखर कारखाना सभासदांच्या मालकीचा राहावा, यासाठी आम्ही लढा उभारला आहे. गणपती संघाला तो खरोखरच चालवायचा असेल, तर त्यांनी विक्री व्यवहार कायम होऊन मिळावा यासाठी दाखल केलेली याचिका पाठीमागे घेऊन, राज्य बॅँकेकडून दीर्घ मुदतीसाठीची निविदा प्रसिध्द करण्यासाठी खासदार संजय काका पाटील यांनी प्रयत्न करावेत, असे आवाहन कारखान्याचे माजी संचालक आर. डी. पाटील यांनी केले. खासदार संजयकाका पाटील यांनी केलेल्या टीकेला कारखाना बचाव समितीच्यावतीने प्रसिध्दी पत्रकाद्वारे उत्तर दिले. तासगाव कारखान्याबाबत अंतिम निर्णय घेण्याचा अधिकार राज्य सहकारी बॅँकेचा असून, सरकारला याबाबतीत निर्णय घेण्याच्या मर्यादा यापूर्वीच स्पष्ट झाल्या आहेत. कारखान्याची मालमत्ता राज्य बॅँकेने सिक्युरिटायझेशन कायद्यांतर्गत ताब्यात घेतली आहे. राज्य बॅँकेच्या तत्कालीन लोकनियुक्त संचालक मंडळाने अवघ्या १४ कोटी ५१ लाखाला खासगी पध्दतीने विक्री करण्याचा निर्णय घेतला होता. परंतु सभासदांच्या रेट्यामुळे व कायदेशीर प्रक्रियेमुळे विक्री व्यव्हार पूर्ण होऊ शकला नाही. राज्य बॅँकेच्या प्रशासन मंडळाने विक्री व्यवहार रद्द केला आहे. तसे प्रतिज्ञापत्रही उच्च न्यायालय व डी.आर.ए.टी. न्यायालयात दाखल केले आहे. लवकरच या प्रकरणाची सुनावणी होऊन अंतिम निर्णय होणार आहे. नंतर या मालमत्तेचे काय करायचे, याबाबतचे निर्णय घेण्याचे सर्वस्वी अधिकार हे राज्य बॅँकेला आहेत. ज्येष्ठ नेते एन. डी. पाटील व सहकारमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्यामध्ये मुंबईत बैठक झाली. विक्री व्यवहारातील बेकायदेशीर व बोगसगिरी डॉ. पाटील यांनी सहकारमंत्र्यांच्या निदर्शनास आणून दिली आहे. यावेळी हा कारखाना भाडेतत्त्वावर देण्यासाठी राज्य बॅँकेच्या प्रशासक मंडळाच्या मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत बैठकीचे आयोजन करण्याचे मान्य केले आहे. येत्या काही महिन्यात बॅँकेची निवडणूक होत आहे. लोकनियुक्त संचालक मंडळ अस्तित्वात आल्यानंतर हा कारखाना सभासदांच्या मालकीचा ठेवून तो दीर्घ मुदतीने भाडेतत्त्वावर चालविण्यास देण्यासंदर्भात मार्ग काढण्याचे आश्वासन खा. शरद पवार व आमदार सुमनताई पाटील यांनी दिले आहे. आम्ही सर्वजण तासगाव कारखाना सभासदांच्या मालकीचा राहून तो चालू करण्यासाठी व्यापक लढा उभारला आहे. खा. संजयकाका जर पुढाकार घेणार असतील, तर त्यांना आम्ही सहकार्य करूच, पण त्यांनी विक्री व्यवहारासंदर्भात दाखल केलेली याचिका मागे घेतल्यावरच तिढा सुटेल, असेही पाटील यांनी सांगितले. (वार्ताहर)
तासगाव कारखान्यासाठी संजयकाकांनी पुढाकार घ्यावा
By admin | Updated: January 30, 2016 00:14 IST