सांगली : न्यायालयात सुनावणीला आणलेल्या चोरट्या प्रियकरास भेटण्यास आलेल्या प्रेयसीला पोलिसांनी अडविले. पोलीस गाडीजवळ ती बोलत असताना पोलिसांनी विरोध केल्याने प्रेयसीने पोलिसांना दमदाटी करीत धुडगूस घातला. राजवाडा चौकात मंगळवारी दुपारी अडीच वाजता हा प्रकार घडला. जोरजोराने ही प्रेयसी पोलिसांच्या नावाने खडे फोडू लागल्याने बघ्यांची मोठी गर्दी झाली होती.महिलांच्या गळ्यातील दागिने हिसडा मारून लंपास केल्याप्रकरणी विश्रामबाग पोलिसांनी सहा महिन्यांपूर्वी दोन संशयित गुन्हेगारांना पकडले होते. या दोन्ही गुन्हेगारांना जामीन मंजूर झालेला नाही. त्यामुळे ते कोल्हापुरातील कळंबा कारागृहात न्यायालयीन कोठडीत आहेत. मंगळवारी त्यांची न्यायालयात सुनावणी असल्याने त्यांना सांगलीत आणले होते. ते पोलीस गाडीत बसले होते. गाडी राजवाडा चौकात लावली होती. त्यांच्या बंदोबस्तासाठी चार पोलीस होते. त्यावेळी यातील एका गुन्हेगाराची प्रेयसी त्याला भेटण्यासाठी आली होती. पोलीस गाडीजवळ थांबून खिडकीच्या जाळीतून या दोघांचा संवाद सुरू होता. पोलिसांनी हे पाहून प्रेयसीला तेथून जाण्यास सांगितले. पण ती ऐकण्याच्या तयारीत नव्हती. पोलिसांनी तुझ्याविरुद्ध कारवाई करेन, असे सांगितले. तरीही ती ऐकत नव्हती. प्रियकराशी बोलताना पोलिसांचा अडथळा ठरू लागल्याने प्रेयसी संतापली. ती पोलिसांच्या नावाने खडे फोडत त्यांना दमदाटी करू लागली. जोरजोराने ओरडू लागली. हा धुडगूस पाहून बघ्यांनी राजवाडा चौकात मोठी गर्दी केली. कोणताही अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलिसांनी दोन्ही गुन्हेगारांना गाडीतून उतरून न्यायालयाकडे नेले. तरीही ही तरुण पोलिसांच्या नावाने ओरडत होती. हा प्रकार समजताच शहर पोलिसांचा ताफा राजवाडा चौकात दाखल झाला होता. तोपर्यत ही तरुणी गायब झाली होती. या प्रकाराची शहरात चांगलीच चर्चा रंगली होती. (प्रतिनिधी)पोलीसप्रमुख थांबलेप्रेयसीचा धुडगूस सुरू होता, त्यावेळी जिल्हा पोलीसप्रमुख सुनील फुलारी या मार्गावरून निघाले होते. राजवाडा चौकातील गर्दी पाहून ते थांबले. काय झाले आहे, याची माहिती घेऊन चौकशीचे आदेश दिले. प्रेयसीविरुद्ध शासकीय कामात अडथळा आणल्याचा गुन्हा दाखल करण्याची सूचना केली होती; पण रात्री उशिरापर्यंत शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झालेला नव्हता.
सांगलीत तरुणीचा धुडगूस
By admin | Updated: September 1, 2015 22:20 IST