सांगली : सांगली जिल्ह्याचे पालकमंत्री निष्क्रिय आहेत, तर राज्य शासन कुचकामी असल्याने काेरोना उपाययोजना होत नाहीत, अशी टीका आ. गोपीचंद पडळकर यांनी आज येथे केली.
सांगली जिल्ह्यातील कोरोनाच्या गंभीर परिस्थितीबाबत आ. खोत व आ. पडळकर यांनी जिल्हाधिकारी डॉ. अभिजित चौधरी यांना मागण्यांचे निवेदन दिले. त्यानंतर आ. खोत व आ. पडळकर यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
ते म्हणाले, कोरोनाचा जिल्ह्यात कहर सुरू असताना पालकमंत्र्यांनी सांगली जिल्ह्यात तळ ठोकून बसायला हवे होते. मात्र, विरोधी आमदारांची खिल्ली उडवायची आणि त्यांच्या मागण्या मान्य करायच्या नाहीत, अशी भूमिका ते घेत आहेत. वर्षापूर्वी विरोधी आमदारांनी त्यांच्याकडे ऑक्सिजन प्लांट उभारण्याची मागणी केली होती. पालकमंत्री जयंत पाटील यांनी जाणीवपूर्वक या मागणीकडे दुर्लक्ष केले. आता ऑक्सिजनचा जिल्ह्यात मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवत आहे.
आ. पडळकर म्हणाले, महात्मा फुले योजनेतून उपचार केले जात असलेल्या रुग्णालयांची संख्या वाढवावी. रेमडेसिविरही मागणीप्रमाणे मिळत नाहीत. गेल्या दोन दिवसांत एकही ऑक्सिजन बेड उपलब्ध नाही. मिरज येथील शासकीय रुग्णालयात आणखी बेड वाढवण्याची आवश्यकता आहे.
चौकट
राजकारण बाजूला ठेवा -खोत
खोत म्हणाले की, शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस या पक्षांनी भाजपची जिरवायची या उद्देशाने सत्ता मिळवली. मात्र, महाविकास आघाडी आता जनतेची जिरवत आहे. राजकारण बाजूला ठेवून कोरोनाच्या संकटातून सत्ताधाऱ्यांनी जनतेला बाहेर काढावे.