सांगली : आधी महापूर, नंतर कोरोनाने बाजारपेठेचे मोठे नुकसान केले. आता पुन्हा लाॅकडाऊन नको रे बाबा, अशी भूमिका सांगली शहरातील व्यापाऱ्यांनी घेतली आहे. बाजारपेठेतील गर्दी टाळण्यासाठी आम्ही सहकार्याची भूमिका घेऊ. व्यवसायावर वेळेची मर्यादा घाला, जिल्हाबंदी लागू करा, पण लाॅकडाऊन करू नका. तो आर्थिकदृष्ट्या परवडणार नाही. शासनाने लाॅकडाऊनचा निर्णय घेतल्यास तो धुडकावून लावण्याचा इशाराही व्यापाऱ्यांनी दिला आहे.
जिल्ह्यात गेल्या आठ दिवसांत कोरोना रुग्णांची संख्या झपाट्याने वाढत आहे. गेल्या तीन दिवसांत तर तिप्पट रुग्णसंख्या झाली आहे. त्यामुळे शासनाच्या निर्देशानुसार जिल्हा व महापालिका प्रशासनाने काही निर्बंध लागू केले आहे. त्यात लाॅकडाऊनची भीतीही व्यापाऱ्यांना सतावू लागली आहे. व्यापारी एकता असोसिएशनचे अध्यक्ष समीर शहा यांनी लाॅकडाऊनला तीव्र विरोध केला आहे. महापूर, कोरोनाच्या संकटात शासन व स्थानिक प्रशासनाने व्यापाऱ्यांना कसलीही मदत केलेली नाही. आता पुन्हा लाॅकडाऊन झाल्यास व्यावसायिकांचे कंबरडेच मोडणार आहे. त्यामुळे लाॅकडाऊनविरोधात व्यापारी तीव्र आंदोलन करण्याच्या तयारीत आहेत.
चौकट(आयडी फोटो)
कोट
मागील लॉकडाऊनच्या परिणामांतून व्यापारी अजून बाहेर पडलेले नाही. ८० टक्के व्यापार ठप्प आहे. राज्य सरकारचे आदेश जसेच्या तसे जिल्ह्यात लागू करू नये. जिल्ह्याचा स्वतंत्र विचार करून निर्णय घ्यावा. व्यवसायाची वेळ मर्यादित करू शकतो, हवे तर जिल्हाबंदी करावी. लॉकडाऊनचा निर्णय बाजारपेठेवर लादू नये. त्याला आमचा तीव्र विरोध आहे. - समीर शहा, व्यापारी एकता असोसिएशन
चौकट (आयडी फोटो)
कोट
सोने-चांदीचे दर उतरत आहेत. त्यात लग्नसराई आहे. आधीच या व्यवसायात मंदी होती. त्यात कोरोनाच्या लाॅकडाऊनमुळे न भरून येणारे नुकसान झाले आहे. लाॅकडाऊन संपून पाच महिने झाले, तरी मागील नुकसानच भरून निघालेले नाही. पुन्हा लाॅकडाऊन केल्यास संपूर्ण व्यापारच संपून जाईल. गर्दी टाळण्यासाठी व्यवसायाची वेळ फार तर कमी करावी. पण, संपूर्ण लाॅकडाऊन नकोच. - पंढरीनाथ माने, सचिव, जिल्हा सराफ असोसिएशन
चौकट (आयडी फोटो)
कोट
कोरोनाचा संसर्ग टाळण्यासाठी लाॅकडाऊन हा पर्याय नाही. आधीच्या लाॅकडाऊनमुळे व्यापाऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. त्याकाळी व्यापाऱ्यांनी कामगारांनाही पगार देऊन त्यांच्या कुटुंबांची जबाबदारी उचलली होती. पण, गेल्या पाच महिन्यांत व्यापार पूर्वपदावर आलेला नाही. त्यामुळे पुन्हा लाॅकडाऊन झाल्यास बेकारी वाढण्याची भीती आहे. त्याऐवजी दुकानाच्या वेळा कमी कराव्यात. - रमेश शहा, अध्यक्ष, गणपतीपेठ व्यापारी असोसिएशन
चौकट (आयडी फोटो)
कोट
मारुती रोडवरील व्यापाऱ्यांना महापुराचा मोठा फटका बसला होता. त्यातून सावरत असताना कोरोनाचे संकट आले. लाॅकडाऊन झाल्याने छोट्या-मोठ्या व्यापाऱ्यांना आर्थिक नुकसान सोसावे लागले. अनलाॅकनंतर कुठे थोडाफार व्यवसाय सुरळीत होत आहे. त्यात पुन्हा लाॅकडाऊन झाल्यास कधीही भरून न येणारे नुकसान होणार आहे. प्रशासनाने दुकानाच्या वेळा पूर्वीसारख्या ५ अथवा ७ वाजेपर्यंत केल्या तरी चालतील. पण संपूर्ण लाॅकडाऊन नको. - चंद्रकांत पाटील, माजी अध्यक्ष, मारुती रोड व्यापारी असोसिएशन