सांगली : वसगडे (ता. पलूस) येथील जिल्हा परिषदेच्या शाळा क्रमांक एकजवळ राहणाऱ्या सुशीला सदाशिव चौगुले (वय ७१) या वृद्धेचे पाच तोळ्यांचे मंगळसूत्र चोरट्यांनी हातोहात लंपास केले. बाजारभावाने त्याची किंमत सव्वालाख रुपये आहे. नेमिनाथनगर येथे आयोजित करण्यात आलेल्या गजानन महाराज प्रकट दिन सोहळ्यात महाप्रसादावेळी ११ फेब्रुवारीला दुपारी बारा वाजता ही घटना घडली आहे; मात्र चौगुले यांनी शनिवारी सायंकाळी विश्रामबाग पोलिसांत फिर्याद दाखल केली आहे. नेमिनाथनगरमध्ये गेल्या आठवड्यात गजानन महाराज प्रकट दिनानिमित्त विविध धार्मिक कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. ११ फेब्रुवारीला महाप्रसाद होता. या कार्यक्रमासाठी सुशीला चौगुले आल्या होत्या. महाप्रसाद घेतल्यानंतर त्या घरी गेल्या. घरातील लोकांना त्यांच्या गळ्यात मंगळसूत्र नसल्याचे दिसून आले. त्यांनी याबाबत विचारणा केल्यानंतर सुशीला यांनाही मंगळसूत्र गळ्यात नसल्याचे लक्षात आले. महाप्रसादावेळी कोणीतरी हिसडा मारून ते लंपास केले असावे, असा सुशीला यांना संशय आला. नातेवाइकांच्या मदतीने त्या तातडीने आल्या. महाप्रसादावेळी आलेल्या ओळखीच्या लोकांकडेही चौकशी केली. तथापि, या चोरीबद्दल कोणालाही माहिती नव्हती. यामुळे शनिवारी सायंकाळी सुशीला यांनी फिर्याद दिली. (प्रतिनिधी)
महाप्रसादावेळी सांगलीत वृद्धेचे मंगळसूत्र लंपास
By admin | Updated: February 15, 2015 00:49 IST