सांगली : किरकोळ वादातून महिलेचा विनयभंग व यातून जातीवाचक शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिल्याचा प्रकार विश्रामबाग येथील देवदत्त अपार्टमेंटजवळ दोन गटात शुक्रवारी रात्री घडला. याप्रकरणी पीडित महिलेसह विरोधी गटाने परस्परविरुद्ध फिर्याद दाखल केली आहे. त्यानुसार पोलिसांनी दोन्ही गटातील आठजणांविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. अद्याप कोणाला अटक केलेली नाही. पीडित महिलेने दिलेल्या फिर्यादीनुसार सर्जू सौदागर, सचिन सौदागर व दत्तात्रय सौदागर (रा. देवदत्त अपार्टमेंटजवळ, विश्रामबाग) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. संशयित शुक्रवारी रात्री साडेआठ वाजता महिलेच्या घरी गेले. तिच्याकडे वाईट नजरेने पाहून लज्जा उत्पन्न होईल असे कृत्य केले. त्यानंतर तिला शिवीगाळ करून जिवे मारण्याची धमकी दिली, असे फिर्यादित म्हटले आहे. दुसऱ्या गटातील सर्जू मोहन सौदागर यांनी फिर्याद दिली आहे. यामध्ये भास्कर नारे, आशिष नारे, अमित नारे, महेश नारे व पीडित महिला (रा. देवदत्त अपार्टमेंटजवळ, विश्रामबाग) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सर्जू सौदागर हे शुक्रवारी रात्री नऊ वाजता गॅलरीत पाणी मारत होते. त्यावेळी संशयित त्यांच्या अंगावर धाऊन गेले. त्यांनी लोखंडी रॉडने मारहाण करण्याचा प्रयत्न केला. तसेच जिवे मारण्याची धमकी देऊन जातीवाचक शिवीगाळ केली, असे फिर्यादित म्हटले आहे. दोन्ही गटाच्या फिर्यादी घेऊन त्यानुसार गुन्हे दाखल केले आहेत. पोलीस उपअधीक्षक प्रकाश गायकवाड तपास करीत आहेत. (प्रतिनिधी)
सांगलीत महिलेचा विनयभंग
By admin | Updated: May 18, 2015 01:03 IST