अविनाश कोळी-- सांगली -संपूर्ण भारतभर मकरसंक्रांतीचा सण साजरा केला जात असला तरी, प्रत्येक भागातील या सणाच्या परंपरा वेगळ्या आहेत. मात्र कोणत्या भागात किती वर्षांपासून हा सण सुरू आहे, याच्या नोंदी मिळणे कठीण आहे. मिरज व सांगलीच्या संस्थानकालीन नोंदीवरून तरी, येथील परंपरा दीडशे वर्षांपेक्षाही अधिक जुनी असल्याचे दिसून येत आहे. मिरजेतील इतिहास संशोधन मंडळाच्या कुमठेकर संग्रहालयात १८६६ पासूनच्या संस्थानकालीन नोंदीवरून, संक्रांतीच्या परंपरेचा सांगली जिल्ह्याचा इतिहास किती जुना आहे, हे दिसून येते. मराठी विश्वकोशात संक्रांतीच्या परंपरेचे दाखलेही १९५१ पासूनचे आहेत. यामध्ये बनारस येथील ब्रजमोहन यांचे ‘हमारे त्यौहार’, अलाहाबाद येथील रामप्रताप त्रिपाठींचे ‘हिंदुओंके व्रत, पर्व और त्यौहार’ (१९६६), आर्यांच्या सणांचा प्राचीन व अर्वाचीन इतिहास, वाई (१९७९) यांचा समावेश आहे. त्यापूर्वीची कागदपत्रे आता मिरजेतील या संग्रहालयात आहेत. पूर्वी मुंबईच्या गव्हर्नरना नवीन वर्षाच्या शुभेच्छांसह तिळगूळ पाठविण्याची परंपरा संस्थानकाळात होती. त्यानुसार हेन्री बार्टल फ्रेयर, रिचर्ड टेम्पल, लॉर्ड रे, जेम्स फर्ग्युसन, विल्यम फित्झराल्ड या त्यावेळच्या गर्व्हनरना दिलेल्या शुभेच्छा व गव्हर्नरनी त्यास दिलेली उत्तरे यांचा संग्रह आहे. संस्थानकालीन परंपरेचाच एक भाग म्हणून त्यावेळी मकरसंक्रांतीचा दरबार भरवला जायचा. त्यासाठीची कार्यक्रमपत्रिका तयार केली जायची. ही सर्व व्यवस्था संस्थानिकांचे खासगी सचिव पाहायचे. त्यावेळी दरबारात वेगवेगळी बैठक व्यवस्था करण्यात येत होती. वैदिक, सरंजामदार, मानकरी, अंमलदार, कारकुन, पेन्शनर्स (खालसा मुलखांतील मिरज येथे राहणारे व स्थानिक पेन्शनर्स), शिक्षक व रयत अशा लोकांसाठी वेगवेगळ्या भागात ही बैठक व्यवस्था असे. राजेसाहेबांना त्यावेळी तिळगूळ देऊन संक्रांतीच्या शुभेच्छा दिल्या जायच्या. संस्थानकडूनही तशाच शुभेच्छा दिल्या जात होत्या. या सणाला सोहळ्याचे स्वरूप त्यावेळी होते. दीडशे वर्षांहूनही अधिक जुन्या परंपरेचा गोडवा लाभलेला हा सण आजही तितक्याच उत्साहात साजरा केला जातो. याला सोहळ्याचे स्वरूप नसले तरी, उत्साह तसाच आहे. सांगली व मिरज संस्थान काळात या सणाला मोठे महत्त्व होते. १८६६ पासून १९0३ पर्यंतच्या या सणाच्या नोंदी मिरजेत आहेत. त्यापूर्वीही हा सण साजरा होत असावा. सांगलीतील संस्थानच्या गणपती मंदिरात दरवर्षी भाविक संक्रांतीला दर्शनासाठी गर्दी करतात. भोगी तसेच वाण देण्याच्या परंपरेचे दाखलेही आहेत. भोगीच्या सुगड पूजनापासून संक्रांतीच्या तिळगूळ देण्यापर्यंतची परंपरा आजही तशीच कायम आहे. अन्य सणांप्रमाणे यात आधुनिकतेचे प्रतिबिंब दिसत नाही. वाण देण्याची परंपरासंस्थानकाळात महागड्या वस्तू वाण म्हणून दिल्या जायच्या. यामध्ये चांदीची भांडी, चांदीच्या वस्तू, नाणी यांचा समावेश होता. सुगड पूजनही केले जात होते. वाण देण्याची ही परंपरा आजही कायम आहे. सध्या छोट्या-छोट्या वस्तू वाण म्हणून भेट दिल्या जातात.असा होता सोहळामकरसंक्रांतीच्या दरबारासाठीच्या निमंत्रण पत्रिकेत बैठक व्यवस्थेचा नकाशाही तयार केला जात होता. युवराजांसह कोणी कोठे बसायचे याचा आराखडा तयार केला जात होता. तिळगूळ देण्याचा कार्यक्रम पार पडल्यानंतर सर्वांना विडा देण्यात येत असे. रितसर परंपरेप्रमाणे दरबार भरविला जात असे.
सांगली, मिरजेच्या संक्रांतीला दीडशे वर्षांचा गोडवा
By admin | Updated: January 15, 2016 00:15 IST