लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील शंभर फुटी रस्त्यावरील मंडप व सजावटीच्या साहित्याचे गोदाम आगीत खाक झाले. सोमवारी दुपारच्या सुमारास ही आग लागली. बघता बघता आगीने रौद्ररूप धारण केल्याने संपूर्ण साहित्य जळून गेले असून, अंदाजे ३० ते ३५ लाखांचे नुकसान झाल्याचा अंदाज आहे. महापालिकेच्या अग्निशनम दलाच्या जवानांनी शर्थीचे प्रयत्न करत आग आटोक्यात आणली.
शहरातील शंभर फुटी रोडवर कासीम शेख मंडप अँड डेकोरेटर्सच्या साहित्याचे गोदाम आहे. सोमवारी दुपारी एकच्या सुमारास गोदामातून धूर येऊ लागल्याने परिसरातील नागरिकांना आगीचा प्रकार लक्षात आला. त्यानंतर तातडीने अग्निशमन दलास माहिती देण्यात आली. आग वाढतच गेल्याने पाच अग्निशमनचे बंब घटनास्थळी दाखल झाले. अग्निशमन दलाच्या जवानांनी दोन तासांनंतर आग आटोक्यात आली. आग कशामुळे लागली याबाबत माहिती मिळू शकली नाही.
महापालिकेचे अग्निशमन अधिकारी चिंतामणी कांबळे यांच्यासह गणेश मोरे, उमेश सर्वदे, लिंगाप्पा कांबळे, प्रशांत शिंदे, प्रसाद माने, अजित सावंत, अविनाश शेळके या कर्मचाऱ्यांनी आग आटोक्यात आणली.