संजयनगर : सांगलीतील मथुबाई गरवारे महाविद्यालयासमोर शुक्रवारी दुपारी साडेबाराच्यासुमारास खासगी जीप (वडाप) चालक आणि रिक्षाचालक यांच्यात जोरदार वादावादी झाली. दहा रुपयांत वडाप का करतोस, म्हणून रिक्षाचालकाने वडापचालकाला चोप दिला. अन्य वडापचालक व रिक्षा थांबून राहिल्याने काही काळ तणावाचे वातावरण होते. पोलीस घटनास्थळी न आल्याने बराच वेळ वाहतुकीची कोंडी झाली होती.
सांगलीत महापालिकेकडून बसस्थानकाकडे जीपचालक प्रवासी घेऊन निघाला हाेता. या ठिकाणी रिक्षाचालक जमा झाले. त्यांनी संबंधित जीप अडविली. ‘तू दहा रुपयांमध्ये वडाप का करतोस’, अशी विचारणा करून वडापचालकाला मारहाण केली. यामुळे काही काळ वाहतुकीची कोंडी झाली होती. यावेळी घटनास्थळी मोठी गर्दी झाली होती. परंतु, प्रकरण आपापसात मिटवण्यात आले. यानंतर वडापचालक व रिक्षाचालक निघून गेले. नागरिकांनी माहिती देऊनही पोलीस घटनास्थळी हजर झाले नसल्याची चर्चा होती.