सांगली : सांगलीतील प्रगती कॉलनीत सायकलीवरून जाताना मोकाट कुत्रे मागे लागल्यामुळे खड्ड्यात पडून मुलगा गंभीर जखमी झाला. अरमान तोहीद शेख (वय १२) असे त्याचे नाव आहे. त्याच्या मनगटावर दोन ठिकाणी हाडे मोडली आहेत. याला महापालिका वैद्यकीय अधिकारी जबाबदार असल्यामुळे आयुक्त, आरोग्याधिकारी व संबंधित ठेकेदारांवर गुन्हा दाखल करण्याची तक्रार मुलाच्या वडिलांनी जिल्हा पोलीसप्रमुखांकडे केली आहे.
तोहीद शेख यांनी निवेदनात म्हटले की, अरमान दि. ३१ मार्च रोजी सायंकाळी साडेसातला सांगलीतील विश्रामबाग येथील प्रगती कॉलनीतील मुख्य रस्त्याने सायकलवरून एकटा जात होता. रस्त्यावर बसलेल्या चार ते पाच मोकाट कुत्र्यांनी त्याच्यावर अचानक हल्ला केला. त्यापासून बचाव करत असताना सायकल जोरात पळवल्यामुळे खड्ड्यामध्ये सायकल गेल्यामुळे तो उडून पडला. त्यामुळे त्याच्या डाव्या हाताची मनगटावरील दोन्ही हाडे मोडली आहेत. सायकल जोरात पळवली नसती तर त्या भटक्या कुत्र्यांनी हल्ला केला असता. या कुत्र्यांचा बंदोबस्त करण्याची जबाबदारी महापालिका आयुक्त, आरोग्याधिकारी, कर्मचारी व ठेकेदार यांची होती. त्यांच्या दुर्लक्षामुळे ही दुर्घटना घडली आहे. त्यांच्यावर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करावा.