सांगली : ओबीसी आरक्षणप्रश्नी राज्य सरकारने दुर्लक्ष केल्याने त्याच्या निषेधार्थ भाजपच्या वतीने १५ सप्टेंबर रोजी शहरात निदर्शन करण्यात येणार आहे, अशी माहिती भाजप ओबीसी आघाडीचे शहराध्यक्ष अमर पडळकर यांनी दिली.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, पुढील वर्षी होणाऱ्या महापालिका, नगरपालिका, जिल्हा परिषद निवडणुका ओबीसी समाजाला आरक्षण न देताच घ्यावयाच्या असल्याने राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात ओबीसी आरक्षणाची बाजू प्रभावीपणे मांडली नाही. राज्य सरकारने सर्वोच्च न्यायालयात वकीलच उभा केला नाही सत्ताधारी पक्षाचे प्रदेशाध्यक्षच याविषयी सांगत आहेत. मुख्यमंत्री ठाकरे यांनी व आघाडी सरकारचे पालक शरद पवार यांनी नाना पटोले यांच्या आरोपावर खुलासा करावा. शासनाने ओबीसी समाजाच्या प्रश्नाकडे दुर्लक्ष केल्याने त्यांच्या या कृतीचा निषेध करण्यासाठी भाजप ओबीसी आघाडीच्या वतीने आंदोलन करण्यात येणार आहे. जिल्ह्याच्या ठिकाणासह प्रत्येक तालुक्यात आंदोलन करणार असल्याचे पडळकर यांनी सांगितले.