सांगलीत ‘तरुणाईसाठी दाभोलक“ पुस्तकाचे प्रकाशन हमीद दाभोलकर, विनोद शिरसाठ, उत्तमराव निकम आदींच्या हस्ते झाले.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : अंनिसचे संस्थापक डॉ. नरेंद्र दाभोलकर यांचे विचार संपविण्यासाठी सनातन्यांनी त्यांचा खून केला, पण गेल्या साडेसात वर्षांत अंनिसकडे तरुणांचा प्रवाह वाढला आहे. त्यामुळे दाभोलकरांचे विचार संपविण्यात सनातनी शक्ती अपयशी ठरल्याचे प्रतिपादन डॉ. हमीद दाभोलकर यांनी केले. प्रा. प. रा. आर्डे यांच्या ‘तरुणाईसाठी दाभोलकर“ पुस्तकाच्या प्रकाशन कार्यक्रमात ते बोलत होते. साधना साप्ताहिकाचे संपादक विनोद शिरसाठ, मराठा समाज संघटनेचे अध्यक्ष डॉ. उत्तमराव निकम यावेळी उपस्थित होते. अभिनेत्री सोनाली कुलकर्णी व कास्ट मॅटर्स या गाजलेल्या पुस्तकाचे लेखक सूरज येंगडे यांनीही ऑनलाइन सहभाग नोंदविला.
हमीद दाभोलकर म्हणाले, सध्याचा कालखंड आव्हानात्मक आहे. गोडसेच्या विचाराच्या प्रसारासाठी मध्य प्रदेशात शाळा सुरू झाली आहे. अशावेळी दाभोलकरांचे विचारच दिशादर्शी ठरतात. तरुणांमध्ये त्यांनी केलेली गुंतवणूक दूरदर्शीपणाची होती हे स्पष्ट होते. त्यांचा खून करणाऱ्या शक्ती आता जगासमोर आल्या आहेत.
सोनाली कुलकर्णी म्हणाल्या, या कार्यक्रमाविषयी मी पोस्ट टाकली तेव्हा अंनिसच्या कार्यकर्त्यांशिवाय इतर कोणी येणार आहे काय अशी उपहासात्मक प्रतिक्रिया एक-दोघांनी व्यक्त केली. अशा दिशाहीन लोकांचे हात धरून त्यांना प्रवाहात आणण्याची वेळ आली आहे.
सूरज येंगडे म्हणाले, दैवीकरणाविरोधात शाळा व कुटुंबातूनच धडे मिळायला हवेत. लॉकडाऊनमुळे मानसिक तणाव वाढले आहेत. चळवळीतील कार्यकर्त्यांनी हा विषयदेखील प्राधान्याने विचारात घ्यायला हवा.
कार्यक्रमाचे संयोजन राहुल थोरात व सहकार्यांनी केले.
चौकट
जांभुळणी ग्रामपंचायतीत दाभोळकरांचा फोटो
डॉ. हमीद दाभोळकर म्हणाले, पंधरा वर्षांपूर्वी जांभुळणी (ता. आटपाडी ) येथे बोकड बळी थांबविण्यासाठी अंनिसचे कार्यकर्ते गेले होते. या मोहिमेत सहभागी असणारा तेथील तरुण आज गावाचा सरपंच झाला आहे. ग्रामपंचायत कार्यालयात शिवाजी महाराज, फुले, शाहू, आंबेडकरांसोबत डॉ. नरेंद्र दाभोलकरांचाही फोटो त्याने लावला आहे. त्यामुळे उच्च न्यायलयापासून जांभुळणीसारख्या छोट्या गावापर्यंत दाभोलकरांची विचारधारा रुजल्याचे स्पष्ट होते.
--------