सचिन लाड / सांगली कोकणातील संगमेश्वर येथे छत्रपती संभाजीराजेंना औरंगजेबाच्या सेनेने पकडले. फेब्रुवारी १६८९ मध्ये बहादूरगड (ता. श्रीगोंदा) येथे राजेंना नेण्याचा सुरु झालेला प्रवास मिरज व शिराळामार्गे झाला होता. याठिकाणच्या किल्ल्यात त्यांना आणले होते, अशी इतिहास संशोधकांमधून माहिती मिळते. मिरज व शिराळाप्रमाणे खानापूर-आटपाडी सीमेवरील बाणूरगड (भूपाळगड)ही राजेंच्या पदस्पर्शाने पावन झाला आहे. छत्रपती संभाजीराजेंचा १४ मेरोजी जन्मदिन आहे. १६८९ मध्ये राजेंचे कोकणातील संगमेश्वर येथे वास्तव्य होते. त्यावेळी औरंगजेबाने दख्खनची मोहीम काढली होती. मराठ्यांचे किल्ले ताब्यात घेण्यासाठी त्याची ही मोहीम होती. १ फेब्रुवारी १६८९ रोजी राजेंची रायगडला जाण्याची तयारी सुरु होती. त्यावेळी औरंगजेबाचा सरदार मुकर्रब खान याने फौजफाट्यासह संगमेश्वर येथे हल्ला केला. त्यावेळी राजेंकडे कमी प्रमाणात सरदार होते. खानाला राजेंना पकडण्यात यश आले. राजेंना पुढे बहादूरगड येथे नेण्याचे नियोजन करण्यात आले होते. त्यानुसार त्यांना नेण्याचा प्रवास सुरु झाला. या प्रवासात राजेंना मिरज व शिराळा येथील किल्ल्यांमध्ये आणण्यात आले होते. मुघलांची राजवट असल्याने येथे आणण्यात आले होते, अशी इतिहास संशोधकांमधून माहिती मिळते. राजेंच्या पदस्पर्शाने ही दोन्ही गावे पावन झाली आहेत. मात्र संगमेश्वर ते बहादूरगड या प्रवासात राजेंना कोणत्या मार्गाने नेले, याबद्दलही इतिहास संशोधकांमध्ये मतभेद आहेत.
संभाजीराजेंना नेले होते मिरज, शिराळामार्गे
By admin | Updated: May 14, 2016 00:51 IST