मिरज : मिरजेत आयोजित समर्थ विद्या सरस्वती करंडक विद्युतझोतातील कबड्डी स्पर्धेत विजेता संघ म्हणून राजारामबापू व्यायाम मंडळ (कासेगाव) संघाने विजेतेपद मिळविले. साधना व्यायाम मंडळ कुरुंदवाड संघाने उपविजेतेपद मिळविले.
अनिल कुलकर्णी सांस्कृतिक मंचाचे अध्यक्ष शैलेश देशपांडे यांच्या नेतृत्वाखाली श्री समर्थ मंडळ पोलीस भरती प्रशिक्षण केंद्र पुणे, संत सेवा संघ व सव्यसाची गुरुकुलम वेंगरुळ, श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान, सरपंच हरबा तालीम, मिरज विद्या समिती यांच्यातर्फे विद्यामंदिर प्रशालेत राज्यस्तरीय ५५ किलो वजनी पुरुष गटातील निमंत्रितांच्या श्री समर्थ विद्या सरस्वती करंडक कबड्डी स्पर्धा पार पडल्या.
मिरज विद्या समितीचे कार्यवाह अनिल कुलकर्णी, उपाध्यक्षा अश्विनी कुलकर्णी, समेधा देशपांडे, अमोघ कुलकर्णी व मिरज विद्या समितीच्या सर्व संचालकांच्या उपस्थितीत उद्घाटन झाले. यावेळी शिवप्रतिमा, हनुमान प्रतिमा व शस्त्र पूजन करण्यात आले. सव्यसाची गुरुकुलमच्या शिष्यांनी आचार्य लखन गुरुजी यांच्या मार्गदर्शनाखाली ऐतिहासिक शस्त्रांची प्रात्यक्षिके सादर केली. संस्थेचे अध्यक्ष शैलेश देशपांडे यांनी प्रास्ताविक केले. प्रमुख पाहुणे विशाल पाटील यांनी या कबड्डी स्पर्धांच्या आयोजनाचे कौतुक केले. स्पर्धेत आरग, सांगली, सांगलीवाडी, राशिवडे, वाजेगाव, माधवनगर, मिरज, चिंचणी, कुरुंदवाड, कासेगाव, तासगाव, मांजर्डे येथील १६ संघ सहभागी होते. आमदार सुरेश खाडे, अभिनेत्री ऋजुता देशमुख यांच्याहस्ते बक्षीस वितरण पार पडले. यावेळी जिल्हा कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष रामभाऊ घोडके, माजी जिल्हा परिषद सदस्य विनायक बागडी, राजेंद्र मेढेकर, डॉ. शरद टोपकर, शैला टोपकर, इतिहासकार सुनील लाड उपस्थित होते. संतोष शिवराई यांनी स्वागत केले. स्पर्धेचे विजेतेपद कासेगावच्या राजारामबापू व्यायाम मंडळाने, तर उपविजेतेपद कुरुंदवाडच्या साधना व्यायाम मंडळाने पटकावले. राशिवडेच्या शिवगर्जना संघाने तृतीय, तर सांगलीवाडीच्या तरुण मराठा मंडळाने चाैथा क्रमांक पटकावला.
विजेत्या संघांना चषक, सन्मानचिन्ह व प्रशस्तिपत्र देऊन गौरविण्यात आले. उत्कृष्ट चढाईपटू म्हणून अविनाश झळके, उत्कृष्ट पकड स्वप्निल पवार, अष्टपैलू खेळाडू विवेक शेळके व आदर्श संघ म्हणून शिवगर्जना राशिवडे यांना पारितोषिक देण्यात आले. मुख्याध्यापक राजीव कुलकर्णी यांनी आभार मानले.