लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : संसार म्हटलं की भांड्याला भांडे हे लागणारच. मात्र, याच वादातून अनेकांच्या संसाराची वाताहत होते. क्षणिक रागापायी केलेल्या मारहाणीमुळेही अनेकांच्या सुखी संसाराची स्वप्ने मोडून पडतात. यावर उपाय म्हणून महिला व बालकल्याण विभागाकडून सखी वनस्टॉप सेंटर सुरू करण्यात आले आहे. गेल्या वर्षभरात या सेंटरने २३३ जणांचे समुपदेशन करत पती-पत्नीमधील विसंवादाला स्टॉप दिला आहे.
महिलांवर होणारे अत्याचार, लैंगिक शोषण, निराधार महिलांच्या समस्या सोडविण्यासाठी ११ जानेवारी २०१९ ला सांगलीत सखी वन स्टॉप सेंटर सुरू करण्यात आले. वर्षभरात २३३ केसेसची नोंद झाली असली तरी, त्यातील १३४ जणांच्या तक्रारींचे निवारण करण्यात आले आहे. त्यात १४ पीडितांना वैद्यकीय मदत, तर ९० महिलांना कायदेशीर मदत करण्यात आली आहे. पोलिसात तक्रार दाखल झाल्यानंतर १६ महिलांना सेेंटरच्यावतीने मदत करण्यात आली.
नवरा-बायकोमध्ये वाढलेला विसंवाद कमी करण्याबरोबरच त्यांच्या अडचणीही सोडविण्यास सखी वनस्टॉप सेंटर कार्यरत असल्याने पीडित महिलांना याचा चांगला लाभ मिळत आहे. सांगलीतील सेंटरने जिल्ह्यासह कोल्हापूर, कऱ्हाड, पिंपरी चिंचवड, सोलापूर, चिकोडी येथीलही प्रकरणे हाताळत त्यांचे समुपदेशन केले आहे.
चौकट
४५ महिलांचे संसार रुळावर
मारहाण, वादावादीसह किरकोळ कारणावरून संसार तुटण्याच्या उंबरठ्यावर असताना त्यांच्यात योग्य तो समन्वय साधण्यात प्रशासन यशस्वी झाले. त्यामुळे या वर्षभरात ४५ महिलांचे संसार पुन्हा एकदा जोडण्यात आले आहेत.
चौकट
लॉकडाऊन कालावधीतही काम
लॉकडाऊन कालावधीत सर्वजण घरीच थांबल्याने वादावादी, मारहाणीच्या घटना वाढल्या होत्या. त्यामुळे या कालावधीत सखी सेंटर २४ तास कार्यरत होते. फोनवरून, व्हिडीओ कॉन्फरन्सिंगद्वारे सल्ला व पोलीस मदत देण्यात आली. जिल्हा महिला व बालकल्याण अधिकारी सुवर्णा पवार यांच्या मागदर्शनाखाली कायदेविषयक सल्लागार ॲड. दीपिका बोराडे यांच्यासह टीम यासाठी कार्यरत आहे.
चौकट
तालुकानिहाय तक्रारी
मिरज १७६
जत ११
वाळवा ४
खानापूर ६
तासगाव १०
शिराळा ५
पलूस ५
कडेगाव ३
कवठेमहांकाळ ३