लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : महापालिकेच्या नूतन मुख्यालयासाठी कृषी विभागाकडून जागा देण्यात आली आहे. सध्या जागेवर नवीन इमारत बांधताना तांत्रिक अडचणी येणार आहेत. त्यासाठी सुधारित जागा उपलब्ध करून द्यावी, असे साकडे गुरुवारी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांनी कृषिमंत्र्यांना घातले.
मुंबईत कृषिमंत्री दादा भुसे यांची महापौरांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने भेट घेतली. यावेळी राष्ट्रवादीचे शहर जिल्हाध्यक्ष संजय बजाज, माजी नगरसेवक शेखर माने उपस्थित होते. सूर्यवंशी म्हणाले की, सांगली, मिरज आणि कुपवाड या तीन शहरांच्या मध्यवर्ती ठिकाणी महापालिकेच्या नवीन मुख्यालयाचे नियोजन केले आहे. त्यासाठी कृषी विभागाची अडीच एकर जागाही महापालिकेला देण्यात आली आहे. या जागेवर नवीन मुख्यालयाचा आराखडा तयार करण्यात आला आहे. जवळपास ३३ कोटी रुपये खर्चून नवे मुख्यालय उभारले जात आहे; पण कृषी विभागाने दिलेल्या जागेत इमारत उभी करताना तांत्रिक अडचणी येणार आहेत.
कृषी विभागाची जागा एकसमान मापाची नाही. समोरील दर्शनी जागेचे मोजमापही कमी आहे. त्यामुळे मुख्यालयाकडे जाणारा रस्ता कमी रुंदीचा होणार आहे. त्यासाठी सुधारित जागा कृषी खात्याकडून उपलब्ध करून द्यावी, अशी मागणी कृषिमंत्र्यांकडे केली आहे. त्यांनी तातडीने प्रस्ताव पाठविण्याची सूचना केल्याचेही सूर्यवंशी यांनी सांगितले.