अशोक पाटील --इस्लामपूर घटकपक्षाला न्याय देण्यासाठी भाजप सरकारने दोन वर्षे घालवली. मोदी लाट ओसरत चालली आहे, अशी हवा होताच सहयोगी पक्षाला न्याय देण्याची भूमिका भाजप कोअर कमेटीने घेतली आहे. वाळवा—शिराळ्यात ऊस उत्पादक आणि भाजप, काँग्रेस, शिवसेनेच्या ताकदीवर शड्डू ठोकणारे सदाभाऊ खोत यांना भाजपने आमदार पद देऊन शासकीय खुराक चालू केला आहे. परंतु मंत्रीपद मिळेपर्यंत खोत अस्वस्थ राहणार आहेत, तर स्वाभिमानी शेतकरी संघटनेला मदत करणारे आमदार शिवाजीराव नाईक गटात मोठी अस्वस्थता दिसत आहे.वाळवा — शिराळ्यातील राजकीय परिस्थिती पाहता, माजी मंत्री जयंत पाटील यांना शह देण्यासाठी सर्वपक्षीय नेते नेहमीच एकत्र येतात. लोकसभा निवडणुकीत स्वाभिमानी संघटनेला पोलिंग एजंट मिळणेही मुश्किल असताना, राष्ट्रवादी आणि काँग्रेसच्या विरोधात राजू शेट्टी यांच्यासाठी शिवाजीराव नाईक हे थेट रणांगणात उतरले होते, तर विधानसभा निवडणुकीत राजू शेट्टी यांनी त्यांचा पैरा फेडला. केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी प्रचारावेळीच, ‘नाईक यांना निवडून द्या, त्यांना कॅबिनेट मंत्रीपद देण्याची जबाबदारी माझी’, असा शब्द जनतेला दिला होता. याला दोन वर्षाहून अधिक काळ लोटला तरी, गडकरी यांनी आपला शब्द पाळलेला नाही. त्यातच भाजपचे सहयोगी स्वाभिमानी संघटनेतील सदाभाऊ खोत यांना आमदार पद देऊन आमदार शिवाजीराव नाईक गटात अस्वस्थता पसरवली आहे.सांगली जिल्ह्याच्या पालकमंत्री पदाची जबाबदारी चंद्रकांतदादा पाटील यांच्यावर आहे. परंतु जिल्ह्याकडे त्यांचे लक्षच नाही. जिल्ह्यात माजी मंत्री पतंगराव कदम यांनी काँग्रेसची ताकद अबाधित ठेवण्याचा प्रयत्न केला आहे, तर माजी मंत्री जयंत पाटील राष्ट्रवादीच्या ताकदीवर स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत.जिल्ह्यात भाजप आमदारांची संख्या जास्त असूनही त्यांच्याकडे मोदी लाटेव्यतिरिक्त कार्यकर्त्यांची फळी नाही. त्यातच निवडणूक निकालानंतर आमदार शिवाजीराव नाईक मंत्रिपदाच्या प्रतीक्षेत आहेत. त्यांचे राजकारण व प्रशासनात मोठे योगदान आहे. तरीही त्यांना तब्बल दोन वर्षाहून अधिक काळ मंत्रिपदाची वाट पाहावी लागली आहे. आता होणाऱ्या मंत्रिमंडळ विस्तारात तरी आ. नाईक यांना मंत्रीपद मिळणार का? याबाबत चर्चेला ऊत आला आहे. त्यामुळे जिल्ह्यात नेमके मंत्रीपद कोणाला मिळणार? याकडे संपूर्ण जिल्ह्याच्या राजकारण्यांचे लक्ष लागून राहिले आहे.लोकसभा, विधानसभा निवडणुकीत महायुतीच्या चर्चेनुसार घटकपक्षाला संधी देण्याविषयी धोरण ठरले आहे. त्याप्रमाणे सदाभाऊ खोत यांना आमदार पदाची संधी देण्यात आली आहे. याचा परिणाम स्थानिक पातळीवर होणार नाही. विधानसभा निवडणुकीत भाजपचे नेते, केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी आम्हाला मंत्रिपदाचे आश्वासन दिले आहे. त्याप्रमाणे आमदार शिवाजीराव नाईक मंत्रिपदाचे दावेदार आहेत.रणधीर नाईक, जि. प. सदस्यस्वाभिमानीत उलट-सुलट चर्चा..!स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे प्रदेशाध्यक्ष सदाभाऊ खोत यांना आमदार करुन भाजप सरकारने त्यांना बारावी पास केले आहे. त्यांनी आता इतर स्वप्ने न पाहता शेतकऱ्यांचे प्रश्न मार्गी लावावेत. स्वाभिमानीचे सर्वेसर्वा खासदार राजू शेट्टी यांनी लोकसभा निवडणुकीवेळी कृषिमंत्री होण्याचे स्वप्न पाहिले होते. त्यांचे स्वप्न केंद्रात साकार होण्याची वेळ आली आहे, अशी चर्चा स्वाभिमानीच्या कार्यकर्त्यांमध्ये सुरु आहे.
भाजपच्या खुराकावर सदाभाऊंचा शड्डू
By admin | Updated: June 13, 2016 00:11 IST