सांगली : एस. टी. महामंडळाचे शासनामध्ये विलिनीकरण करुन कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, या मागणीसाठी महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेतर्फे दि. २४ ऑगस्ट रोजी सांगली विभागीय कार्यालयासमोर धरणे आंदोलन करण्यात येणार आहे, अशी माहिती संघटनेचे विभागीय अध्यक्ष अशोक खोत यांनी दिली. तसेच एस. टी. बसेसना डिझेल व तिकीट रोल मिळावेत, या मागण्यांकडेही शासनाचे लक्ष वेधले जाणार आहे.
अशोक खोत म्हणाले, राज्यभर तीव्र आंदोलन करण्याचा निर्णय महाराष्ट्र एस. टी. कामगार संघटनेच्या पुणे येथे झालेल्या राज्य कार्यकारणीच्या बैठकीत घेण्यात आला आहे. या बैठकीला संघटनेचे राज्याध्यक्ष संदीप शिंदे, सरचिटणीस हणुमंत ताटे व राज्यातील पदाधिकारी उपस्थित होते. या बैठकीमध्ये कामगारांना वेळेवर वेतन मिळावे, यासाठी एस. टी. महामंडळातील कर्मचाऱ्यांना शासकीय कर्मचाऱ्यांचा दर्जा द्यावा, प्रलंबित कामगार करारातील चार हजार ८४९ कोटींमधील उर्वरित रकमेचे वाटप करावे, वाढीव घरभाडे भत्ता, महागाई भत्ता, वेतनाचा दर फरकासह मिळावा, दरमहा वेळेत वेतन मिळावे, कोविड काळात कोविड योद्धा म्हणून जिवाची पर्वा न करता कर्तव्य बजावणाऱ्या व मृत्यूमुखी पडलेल्या कर्मचाऱ्यांच्या नातेवाईकांना सर्व लाभ तातडीने द्यावेत, सांगली विभागातील अधिकारी व पर्यवेक्षक यांच्या मनमानी व अरेरावी वृत्तीची वरिष्ठांकडून कोणतीही दखल घेतली जात नाही. याकडे वरिष्ठ अधिकाऱ्यांनी लक्ष घालावे, एस. टी. बसेसना पुरेसे डिझेल मिळावे, तिकीट रोल मिळावेत, आदी मागण्यांसाठी दि. २४ ऑगस्ट रोजी सांगलीतील विभागीय कार्यालयासमोर निदर्शने करुन धरणे आंदोलन करणार आहे.