लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : लॉकडाऊननंतर आधार कार्ड अपडेटसाठी आधार केंद्रांवर गर्दी वाढली आहे. शहरी भागात पुरेशी केंद्रे असली तरी ग्रामीण भागात मात्र गैरसोय होत आहे. विशेषत: राष्ट्रीयकृत बँकांसमोर रांगा लावाव्या लागत आहेत.
जिल्ह्यात ३३७ आधार केंद्रे सुरू आहेत पैकी सांगली शहरात सहा ठिकाणी कामकाज चालते. लॉकडाऊन काळात मार्चपासून ती बंद होती. अपग्रेडेशनवेळी थेट हातांचा संपर्क येत असल्याने ती तत्काळ बंद ठेवण्याचे आदेश शासनाने दिले होते. लॉकडाऊन शिथिल झाल्यानंतरही ती तत्काळ सुरू झाली नाहीत. या काळात सर्रास वर्क फ्रॉम होम सुरू असल्याने आधार कार्डची गरज वाढली होती. अनेकांची कार्ड अपडेट नसल्याने त्यांना प्रचंड त्रास सोसावा लागला. अपग्रेडेशनचे काम ऑनलाईन करता येत नसल्यानेही कामे थांबली. लॉकडाऊननंतर केंद्रे सुरू होताच रांगा लागल्या. विशेषत: बँकांसमोर एकच गर्दी झाली. काही बँकांनी आगाऊ अपॉईंटमेंटद्वारे गर्दी नियंत्रित केली.
सध्या जिल्ह्यात केंद्रे पुरेशी असली तरी काम अपेक्षित गतीने होत नाही. ग्रामीण भागात इंटरनेटची समस्या मोठी आहे. महापुरात काही केंद्रे बंद झाली, ती अजूनही सुरू झालेली नाहीत.
चौकट
अपडेट हवेच ...
नाव, पत्त्यातील बदल, मोबाईल क्रमांक, छायाचित्र व्यवस्थित नसणे इत्यादी कारणांनी आधार कार्ड अपडेट करावे लागते. अनेकांच्या कार्डवर जन्मतारीख पूर्ण नसल्यानेही अपडेट करावे लागते. पाच वर्षांच्या आतील बालकांना सुरुवातीला फक्त छायाचित्राद्वारे कार्ड मिळते. ठसे पालकांचे असतात. पाच वर्षानंतर त्यांचे ठशांसह नवे आधार कार्ड काढावे लागते.
कोट
शिष्यवृत्तीसाठी मुलाचे आधारकार्ड जोडायचे आहे. ते लहानपणी काढल्याने आता नव्याने काढावे लागत आहे. यापूर्वी चारवेळा केंद्रावर येऊन गेले, इंटरनेट नसल्याने काम झाले नाही. आता पुन्हा रांगेत थांबले आहे.
- रोहिणी कोळेकर, सांगली
कोट
भविष्य निर्वाह निधीसाठी मोबाईल क्रमांक जोडलेले आधारकार्ड हवे आहे. यापूर्वी दोनदा येऊन गेलो, गर्दी असल्याने थांबलो नाही. आता अर्धी सुट्टी काढून आलो आहे.
- चंद्रकांत पाटील, सांगली
------
पॉईंटर्स
जिल्हाभरात ३३७ आधार केंद्रे
जिल्हा प्रशासन - १००
पोस्ट ऑफिस - ५०
बँका - १८७