शिराळा : मतदार जनजागृती अभियानात युवकांची भूमिका महत्त्वाची असून युवकांनी राष्ट्रकार्य म्हणून ही भूमिका पार पाडावी, असे आवाहन तहसीलदार गणेश शिंदे यांनी केले.
कोकरूड (ता.शिराळा) येथील बाबा नाईक महाविद्यालय, राष्ट्रीय सेवा योजना विभाग आणि तहसील कार्यालय यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित 'मतदार जनजागृती अभियान' या विषयावर ऑनलाइन वेबिनारचे आयोजन करण्यात आले होते. याप्रसंगी ते बोलत होते.
तहसीलदार शिंदे म्हणाले की, युवकांनी स्वतः मतदार होऊन राष्ट्रकार्यात मोलाचे योगदान द्यावे तसेच मतदानापासून कोणी वंचित राहणार नाही याविषयी युवकांनी जागरूकता निर्माण करावी, असे आवाहन केले तसेच तहसील कार्यालयाकडून मतदार जागृतीविषयी जे कार्य केले जाते याची माहिती दिली. उपस्थितांच्या शंकांचे निरसन केले.
नायब तहसीलदार राजाराम शिद यांनी मार्गदर्शन केले. या वेबिनारच्या अध्यक्षस्थानी बाबा नाईक महाविद्यालय कोकरूडच्या प्राचार्य डॉ.उज्ज्वला पाटील या होत्या. प्रा. डॉ. अनिल काटे यांनी स्वागत केले. या वेबिनार प्राध्यापक, कर्मचारी, विद्यार्थी, तहसीलचे अधिकारी, कर्मचारी उपस्थित होते. राष्ट्रीय सेवा योजना विभागप्रमुख प्रा. डॉ. विनोद राठोड यांनी आभार मानले.