शिराळा नाका ते गेस्ट हाऊस या मुख्य रस्त्याचे काम भूमिपूजनाच्या श्रेयवादासाठी रखडले आहे.
अशोक पाटील
लोकमत न्यूज नेटवर्क
इस्लामपूर : शहरातील प्रभाग ६ मधील विविध भागातील रस्त्यांच्या कामाचे टेंडर आणि रस्त्यांचे कामाचे वर्कआऊट अंतिम झाले आहे. त्यासाठी पालिकेकडे निधीही उपलब्ध आहे. परंतु विरोधी राष्ट्रवादीचे नगरसेवक बशीर मुल्ला आणि सविता आवटी यांना अडचणीत आणण्याचा डाव विकास आघाडी करीत आहे. त्यातच या रस्त्यांचे उद्घाटन कोणी करायचे, यासाठी या प्रभागातील सर्वच रस्ते प्रतीक्षेत आहेत.
‘लोकमत’ने प्रभाग ६ मधील रस्त्यांच्या अवस्थेविषयी वारंवार आवाज उठविला आहे. पालकमंत्री जयंत पाटील यांनी शहरात बुथ कमिटीच्या बैठका घेतल्या. प्रभाग ६ मधील बैठकीत नागरिकांनी रस्त्यांच्या तक्रारी मांडल्या होत्या. त्यांनी या रस्त्यासाठी निधीही देतो, असे आश्वासन दिले होते. ते पूर्णही करण्यात आले आहे. वैशिष्ट्यपूर्ण निधीतून या प्रभागाला दीड कोटी रुपये मिळाल्याचे राष्ट्रवादीचे पदाधिकारी अंगराज पाटील यांनी सांगितले. परंतु उद्घाटन कोणी करायचे, या श्रेयवादासाठी रस्त्यांची कामे रखडली आहेत. समतानगर २६ लाख, शिवनगर २६ लाख, संभाजीनगर ५ लाख ७२ हजार, शिराळा नाका ते गेस्ट हाऊसपर्यंत ५२ लाख ४८ हजार, श्रीपादनगर २२ लाख, विशालनगर ८ लाख ८२ हजार, तसेच ब्लड बॅँक परिसर १२ लाख रुपयांचा निधी मंजूर आहे. सध्या शहरातील भुयारी गटारीचे काम ठप्प आहे. प्रभाग ६ मधील ज्याठिकाणची भुयारी गटारे झाली आहेत, हे रस्ते होणे आवश्यक आहे. परंतु ते विकास आघाडी आणि राष्ट्रवादीच्या श्रेयवादात अडकले आहेत. त्यामुळे निधी असूनही अद्यापही रस्त्यांच्या कामांची उद्घाटने केली नाहीत. यामध्ये सत्ताधारी विकास आघाडी विरोधी राष्ट्रवादीला अडचणीत आणण्याचा प्रयत्न करीत असल्याची चर्चा आहे.
कोट
गेल्या कित्येक वर्षांपासून प्रभाग ६ मध्ये रस्त्यांचा अभाव आहे. नगरसेविका सविता आवटी आणि बशीर मुल्ला यांनी वारंवार रस्त्यांसाठी प्रयत्न केले. त्यांच्या प्रयत्नातून निधीही उपलब्ध आहे. यामध्ये कोणीही राजकारण आणू नये. पावसाळ्याअगोदर हे रस्ते होणे गरजेचे आहे.
- अंगराज पाटील, राष्ट्रवादी पक्ष