शिरटे : येडेमच्छिंद्र (ता. वाळवा) येथील ऋतुराज पांडुरंग पाटील या विद्यार्थ्याने आशिया खंडातील दक्षिण कोरिया सरकारचा तीन वर्षांचा संपूर्ण शैक्षणिक खर्च प्राप्त करून शैक्षणिक क्षेत्रातील सर्वोच्च सन्मानाची डॉक्टरेट (पीएच.डी.) पदवी संपादन केली आहे.
त्यांचे प्राथमिक शिक्षण येडेमच्छिंद्र गावातील जिल्हा परिषद शाळेमध्ये मराठी माध्यमातून झाले तर माध्यमिक शिक्षण श्री मच्छिंद्रनाथ हायस्कूलमध्ये झाले. महाविद्यालयीन शिक्षण कृष्णा महाविद्यालयातून झाले. एम.एससी. त्यांनी शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर या ठिकाणी नॅनो टेक्नॉलॉजी या नवीन सुरू झालेल्या विषयातून गुणवत्तापूर्ण रीतीने पूर्ण केली. शिवाजी विद्यापीठातून दक्षिण कोरिया सरकारची पीएच.डी.साठी असणारी या विषयातील फेलोशिप मिळविणारे ते पहिले विद्यार्थी ठरले आहेत. त्यांनी सादर केलेले प्रबंध तेथील नामांकित नियतकालिकांतून प्रसिद्ध झाले आहेत. याही पुढे जाऊन त्याच देशात पीएच.डी.नंतरच्या पोस्ट पीएच.डी.च्या अभ्यासक्रमासाठीही त्यांची निवड झाली असून, आणखी दोन वर्षे ते तेथेच राहणार आहेत. हा अभ्यासक्रम दक्षिण कोरिया सरकारच्या खर्चातून पूर्ण करणारे ऋतुराज पाटील हे ग्रामीण भागातील पहिले विद्यार्थी ठरले आहेत.