कोरोनाची दुसरी लाट ओसरत असताना बिळाशी येथे मात्र दररोज रुग्णांमध्ये भर पडत आहे. गृहविलगीकरणात असणाऱ्या रुग्णांचे नातेवाईक बिनधास्तपणे गावातून वावरत असल्यामुळे कोरोनाचा प्रसार झपाट्याने सुरू आहे. याबाबत ग्रामपंचायत प्रशासनाने गांधारीची भूमिका घेतली. स्थानिक प्रशासनाने कडक निर्बंध लावून आठ दिवस गाव पूर्ण बंद न केल्यास बिळाशी हॉटस्पॉट होण्याची शक्यता आहे.
पाच रुग्ण ऑक्सिजनवर असून यातील दोन रुग्णांची प्रकृती चिंताजनक आहे. या परिस्थितीकडे तहसीलदार व पोलीस प्रशासनाने ही लक्ष घालणे गरजेचे आहे. ‘अत्यावश्यक सेवा’वगळता इतर सर्व दुकाने आठ दिवसांसाठी बंद करून कडक निर्बंध लावणे गरजेचे असल्याचे मत नागरिकांतुन व्यक्त होत आहे. किराणा दुकान व इतर दुकाने सात ते चारपर्यंत उघडे ठेवण्याची परवानगी देत असताना सायंकाळी नऊपर्यंत दुकाने चालू असतात.