लोकमत न्यूज नेटवर्क
भिलवडी : भिलवडी (ता. पलूस) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रावर कोरोना प्रतिबंधक लस घेण्यासाठी आलेल्या नागरिकांनी पहाटे तीनपासून रांगा लावल्या होत्या. गर्दी झाल्याने एकमेकांना शिवीगाळ करून व मारहाणीचे प्रकार घडले. या हुल्लडबाजीचा ज्येष्ठ नागरिकांना त्रास झाला. प्रशासनाच्या नियमावलींचे तीनतेरा वाजले.
चार दिवस भिलवडी आरोग्य केंद्रावर लसीकरणासाठी लोक हेलपाटे मारत आहेत. तुटवडा असल्याने लस न घेताच घरी परतावे लागत आहे. गुरुवारी पहाटे तीनपासून आरोग्य केंद्रावर गर्दी होऊ लागली. कोणीतरी उपस्थितीनुसार नावांची यादी तयार करायला सुरुवात केली. बघता-बघता ही बातमी परिसरात पोहोचली. आज लस येणार असून, नोंद करणाऱ्या व्यक्तींनाच लस दिली जाणार असल्याच्या बातमीने काही तासातच लसीकरण केंद्राला जत्रेचे स्वरूप आले. १५० डोसच असल्याने प्रत्येकजण प्रयत्न करीत होते. विनामास्क आलेल्यांची संख्या मोठी होती. उशिरा आलेल्यांना पहाटे आलेल्यांनी केलेली यादी मान्य नव्हती. परस्परांच्या वादात दोनदा यादी फाडली. परस्परांना शिवीगाळ करीत शर्टची कॉलर धरणे, कानशिलात मारणे, किरकोळ बाचाबाची असे प्रकारही घडले.
प्राथमिक आरोग्य केंद्राच्या डॉक्टरांनी ही यादी अनधिकृत असल्याचे सांगून टोकन दिल्यानुसार लसीकरण केले जाणार असल्याचा पवित्रा घेतला. यावेळी केंद्राच्या दोन्ही दरवाजातून आत घुसण्याचा काही नागरिकांनी प्रयत्न केला. स्थानिक आपत्ती व्यवस्थापन समितीच्या पदाधिकाऱ्यांनी नियमावलीचे पालन करण्याचा सल्ला दिला. भिलवडी पोलिसांनी घटनास्थळी जाऊन बेशिस्त लोकांना खडे बोल सुनावले.
चौकट
प्रांताधिकाऱ्यांच्या सूचनेनंतरही सुधारणा नाहीच
दोनच दिवसांपूर्वी कडेगावचे प्रांताधिकारी गणेश मरकड व पलूसचे तहसीलदार निवास ढाणे यांनी नागरिकांच्या तक्रारीवरून आरोग्य केंद्रातील स्टाफला कामकाज सुधारा अन्यथा प्रशासन विचार करेल, या शब्दात सुनावले होते. तरीही कामकाज व व्यवस्थापनात कोणताच बदल नसल्याचा अनुभव नागरिकांना आला. ज्या ज्येष्ठ नागरिकांचा नियमानुसार लसीचा दुसरा डोस घेण्याचा क्रमांक होता, त्यांनी मात्र घरी जाणे पसंत केले.