मिरज : लॉकडाऊनमुळे आर्थिक विवंचनेतून मिरजेत राहुल चंद्रकांत बाणदार-जाधव (वय २३, रा. नदीवेस, मिरज) या रिक्षाचालकाने शुक्रवारी घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. याबाबत त्याचा भाऊ महेश बाणदार-जाधव यांनी शहर पोलिसांत तक्रार दिली आहे.
राहुल गेली काही वर्षे मिरज शहर परिसरात रिक्षा व्यवसाय करीत होता. गेल्या दीड वर्षांपासून कोरोनाच्या पार्श्वभूमीवर वारंवार लॉकडाऊनमुळे रिक्षा व्यवसाय बंद होऊन उत्पन्न बंद झाल्याने तो आर्थिक विवंचनेत होता. रिक्षाचे कर्ज फेडण्यासाठी त्याच्याकडे पैसे नव्हते. कर्जाचे हप्ते थकले होते.
कोरोनाच्या दुसऱ्या लाटेमध्ये कडक लॉकडाऊनमुळे गेली दीड महिना रिक्षा व्यवसाय पूर्ण बंद असल्यामुळे त्याची आर्थिक कोंडी झाली होती. या नैराश्यातून त्याने शुक्रवारी दुपारी अडीच वाजता घरातील कुटुंबीय बाहेर गेले असताना गळफास घेऊन आत्महत्या केली. भाऊ महेश रात्री घरी आल्यानंतर राहुलने आत्महत्या केल्याचे निदर्शनास आले. याबाबत मिरज शहर पोलिसात याबाबत नोंद झाली आहे.