ऑक्सिजनची गरज असणाऱ्या रुग्णांसाठी सांगलीत रिक्षा ॲम्ब्युलन्स सुरू करण्यात आल्या आहेत. त्यामध्ये ऑक्सिजनचीही सोय केली आहे.
लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : बेड मिळविण्यासाठी कुरुंदवाडहून आलेल्या महिलेला रिक्षा ॲम्ब्युलन्समधून तातडीने रुग्णालयात पोहोचविण्यात आले. सांगलीत सुरू झालेल्या रिक्षा ॲम्ब्युलन्समुळे रुग्णांना अशा प्रकारे दिलासा मिळत आहे.
रिक्षा चालक मालक संघटना, रुग्ण साहाय्यता व समन्वय समिती आणि स्पदंन ग्रुपतर्फे रिक्षा ॲम्ब्युलन्स उपक्रम सुरू करण्यात आला आहे. रुग्णवाहिका परवडत नसलेले रुग्ण रिक्षातून प्रवास करतात. ऑक्सिजन पातळी खालावलेल्या रुग्णांचा प्रवासामध्ये जीव कासावीस होतो. हे लक्षात घेऊन उपक्रम सुरू करण्यात आला. यात सहभागी रिक्षांमध्ये ऑक्सिजन सिलिंडर ठेवण्यात आले आहेत. रुग्ण रुग्णालयात पोहोचेपर्यंत गरज लागल्यास विनामूल्य ऑक्सिजन दिला जातो.
सोमवारी कुरुंदवाड येथून आलेल्या एका महिलेला श्वास घेण्यास त्रास होत होता. तिला तातडीने रुग्णालयात पोहोचविण्यात आले. दोन किलोमीटरच्या प्रवासासाठी फक्त ५० रुपये प्रवासभाडे घेण्यात आले. दरम्यान, मिरज शहरासाठीही तीन रिक्षा रुग्णवाहिका सुरू करण्यात आल्या.
रुग्ण साहाय्यता व समन्वय समिती, रिक्षा चालक मालक संघटना व क्रेडाईच्या वतीने उपक्रम सुरू झाला. महात्मा गांधी चौकी पोलीस ठाण्याचे निरीक्षक शशिकांत चव्हाण व मिरज वाहतूक शाखेचे अजय माने यांच्या हस्ते प्रारंभ झाला. यावेळी पृथ्वीराज पवार, सतीश साखळकर, रामचंद्र पाटील, महादेव पवार, प्रशांत भोसले आदी उपस्थित होते.