न्यूज
संडे स्पेशल
युनूस शेख
इस्लामपूर : शिराळा तालुक्यातील करमाळे येथे महादेव डोंगरात एका झऱ्याच्या स्वरूपात उगम पावलेली तीळगंगा नदी पुढे बहे येथे कृष्णा नदीला मिळते. शिराळा तालुक्यातील करमाळे, तर वाळवा तालुक्यातील सुरूल, ओझर्डे,
रेठरेधरण, नायकलवाडी, माणिकवाडी, पेठ या गावांना नदी पुनरुज्जीवनाचा फायदा होणार आहे. या नदीची पाहणी करण्यासाठी अभिनेता आमिर खान लवकरच भेट देणार आहे.
तीळगंगा नदीचा मुख्य प्रवाह ३२ कि.मी. लांब असून खोऱ्यातील उपप्रवाहदेखील साधारणतः तितकेच लांब आहेत. १८ गावांना या नदीचा लाभ होतो. या नदीच्या पाण्यावर सुमारे २० हजार हेक्टर क्षेत्र ओलिताखाली येणार आहे.
जलनायक प्रकाश पाटील यांच्या मार्गदर्शनानुसार तीळगंगा नदीच्या पुनरुज्जीवनाचे काम सुरू आहे. जलसंवर्धन चळवळीत ते सक्रिय सहभागी आहेत. पाणी फाउंडेशन, यशदा, आनंदवन या संस्थांच्या सतत संपर्कात असतात. पेठ (ता. वाळवा) येथे या नदीवर टायर बंधारा बांधण्यात आला आहे. या कामासाठी डॉ. आमटे यांच्या महारोगी सेवा समितीने आर्थिक मदत केली आहे, तर लोकसहभागातून देखील निधी उभारण्यात आला आहे. तीळगंगा नदीवर बांधलेल्या टायर बंधाऱ्यात १ कोटी लिटर पाण्याची साठवण क्षमता आहे. शेतीला पाणी नसल्याने तरुणाईचा शेतीकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलला आहे. आता आमिर खान करमाळे येथे भेट देत असल्याने गावकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत. तीळगंगा नदीच्या पुनरुज्जीवनासाठी लोकसहभाग महत्त्वाचा आहे. स्थानिक लोकप्रतिनिधी, सामाजिक संस्था, युवक, महिला तसेच समाजातील सर्व घटकांनी एकत्र येऊन काम करणे गरजेचे आहे, तरच तीळगंगा बारमाही वाहती होईल.