सांगली : महापालिका आयुक्त नितीन कापडणीस यांनी शुक्रवारी शिवोदयनगर येथील प्रश्नांचा व कामाचा आढावा घेतला. येथील प्रश्नांची तातडीने सोडवणूक करण्याची सूचना त्यांनी अधिकाऱ्यांना दिली.
शिवोदयनगर येथे बाळूमामा मंदिरापासून कर्नाळ रस्त्याकडे जाणाऱ्या गटारी तुंबल्या आहेत. काहींनी या गटारीवर बांधकाम केले आहे. त्यामुळे ऐन पावसाळ्यात या गटारीतील सांडपाणी नागरिकांच्या दारात साचत आहे. याप्रश्नी येथील नागरिकांनी महापालिकेकडे तक्रारी केल्या हाेत्या. ड्रेनेज कामाबराेबर येथे सुरू असलेल्या रस्त्यांच्या कामाबाबतही नागरिकांनी काही प्रश्न उपस्थित केले हाेते. त्याची दखल घेत आयुक्तांनी याठिकाणी भेट दिली. येथील गटारीचे काम योग्य पद्धतीने पूर्ण करावे, गटारीवरील अतिक्रमणे हटवावीत, रस्त्यांची कामे तातडीने पूर्ण करताना नागरिकांना पावसाळ्यात कोणताही त्रास होऊ नये, याची दक्षता घ्यावी, अशा सूचना अधिकाऱ्यांना दिल्या. यावेळी संजय यमगर, विश्वासराव भोसले, भगवान शिवशरण, अमोल पाटील आदी उपस्थित होते.