मिरज : मोबाईल क्रमाकांचे केवायसी अपडेट करण्याच्या बहाण्याने मिरजेतील निवृत्त शासकीय कर्मचारी प्रमोदकुमार बाळकृष्ण भेडसगावकर (वय ६२, रा. ब्राम्हणपुरी, मिरज) यांना अज्ञात भामट्याने सहा लाख ६६ हजार ९७९ रुपयांना गंडा घातला. याबाबत शहर पोलिसांत अज्ञात भामट्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
प्रमोदकुमार भेडसगावकर यांना एका अनोळखी मोबाईल नंबरवरून सोमवारी सायंकाळी फोन आला. बीएसएनएल नंबरच्या केवायसी अपडेट झाल्या नाहीत. केवायसी अपडेट नाही केल्यास तुमचा मोबाईल आज रात्री बंद होईल. त्यासाठी केवायसी अपडेट करावी लागेल. त्यामुळे तुमची माहिती द्या असे सांगण्यात आले. यासाठी २० रुपये द्यावे लागतील, असेही सांगण्यात आले. अज्ञात भामट्याने भेडसगावकर यांना नाव, जन्म तारीख, एटीएम कर्ड नंबर, सीव्हीव्ही नंबर, बँक खाते नंबर, आयएफएससी कोड नंबर विचारून घेतला. त्यानंतर मोबाईलवर आलेला ओटीपी नंबर विचारला. भेडसगावकर यांनी ओटीपी सांंगितल्यानंतर त्यांच्या खात्यावरून पैसे काढण्यास सुरुवात करण्यात आली. अज्ञाताने केवायसी अपडेट सुरू असल्याचे सांगत भेडसगावकर यांना तब्बल १९ वेळा ओटीपी नंबर विचारून घेतला. त्यांच्या खात्यातून सहा लाख ६६ हजार ९७९ रुपये काढून घेण्यात आले. याप्रकरणी शहर पोलिसांत अज्ञाताविरुद्ध ऑनलाईन फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.