लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : कोरोनाचा वाढता संसर्ग रोखण्यासाठी पाेलीस, आरोग्य कर्मचारी आघाडी घेऊन कार्यरत आहेत. जोखीम पत्करून जनतेच्या आरोग्याचीही काळजी हे दोन्ही घटक घेत आहेत. मात्र, बुधवारी याच खाकी वर्दीतील माणुसकीने आपली बांधीलकी जपल्याचे दिसून आले. जागतिक परिचारिका दिनानिमित्त ड्यूटीवर जाणाऱ्या परिचारिकांचा गुलाबाचे फूल देऊन सत्कार करण्यात आला.
कोरोनाचा संसर्ग रोखण्यासाठी सध्या कडक लॉकडाऊन सुरू आहे. त्यामुळे रस्त्यावर बंदोबस्तासाठी पोलीस व अत्यावश्यक सेवेसाठी कार्यरत असणारेच दिसत आहेत. बुधवारी जागतिक परिचारिका दिनाचे औचित्य साधून शहर पोलीस ठाण्याच्या वतीने हा उपक्रम राबविण्यात आला.
पोलीस उपअधीक्षक अजित टिके, पोलीस निरीक्षक अजय सिंदकर यांच्या मार्गदर्शनाखाली हा उपक्रम घेण्यात आला. यात ड्यूटीवर जाणाऱ्या परिचारिकांचेे गुलाबपुष्प देऊन स्वागत करण्यात आले. कर्तव्यावर असलेल्या महिला पोलिसांनी त्यांचा सत्कार केला. अचानक झालेल्या या आदर सत्कारामुळे परिचारिकाही भारावून गेल्या होत्या.
शहर पोलीस ठाण्याचे सहायक पोलीस निरीक्षक नीलेश बागाव, हवालदार अनंत होळकर यांच्यासह कर्मचारी यावेळी उपस्थित होते.