चिपळूण : नगरपरिषद पाणी पुरवठा विभागासाठी दीड वर्षापूर्वी तुरटी व ब्लिचिंग पावडर खरेदी प्रकरणात गैरव्यवहार झाल्याची तक्रार शिवसेनेच्या नगरसेवक सुरेखा खेराडे यांनी तत्कालिन जिल्हाधिकारी यांच्याकडे केली होती. मात्र, अद्याप याबाबतचा अहवाल गुलदस्त्यात असून, हा अहवाल केव्हा पुढे येणार, याकडे शहरवासीयांचे लक्ष लागून राहिले आहे.नगरपरिषदेमध्ये गेल्या दीड वर्षापूर्वी ब्लिचिंग व तुरटी पावडर पाणी पुरवठा विभागासाठी खरेदी करण्यात आली होती. या खरेदीच्या पावत्यांमध्ये तफावत असल्याची तक्रार नगरसेवक सुरेखा खेराडे यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली होती. त्यांच्याकडून सकारात्मक उत्तर न मिळाल्याने त्यांनी अखेर तत्कालीन जिल्हाधिकारी यांच्याकडे निवेदनाद्वारे तक्रार केली होती. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबतची चौकशी करण्याची सूचना तत्कालीन प्रांताधिकारी प्रसाद उकार्डे यांना केली होती. मात्र, त्यांच्याकडून या चौकशीकडे चालढकल झाल्याने अखेर हा चौकशीचा चेंडू तत्कालीन तहसीलदार जगदीश कातकर यांच्या दालनात गेला. तहसीलदार कातकर यांनी चौकशीचा अहवाल जिल्हाधिकारी कार्यालयाकडे सादर केला आहे. याबाबत जिल्हाधिकारी राधाकृष्णन बी. कोणती भूमिका घेणार, याबाबतही जनतेत उत्सुकता असून, तुरटी गैरव्यवहारप्रकरणी संबंधित दोषी ठरणार अथवा कसे, हे स्पष्ट केव्हा होणार, असा सवालही जनतेतून केला जात आहे. दीड वर्षांपूर्वी खरेदी करण्यात आलेल्या या तुरटी व ब्लिचिंग पावडर खरेदीची चौकशी करण्याची तक्रार दाखल होऊनही त्याबाबत चालढकल होत असल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. (वार्ताहर)चिपळूण नगरपरिषदेत दीड वर्षापूर्वी ब्लिचिंग व तुरटी पावडर पाणीपुरवठा विभागासाठी खरेदी करण्यात आली होती. या खरेदीच्या पावत्यांमध्ये तफावत असल्याची तक्रार नगरसेवक सुरेखा खेराडे यांनी मुख्याधिकारी यांच्याकडे केली होती. त्यांच्याकडून सकारात्मक उत्तर न मिळाल्याने त्यांनी जिल्हाधिकारी यांच्याकडे तक्रार केली होती.
गैरव्यवहाराचा अहवाल अजून गुप्त
By admin | Updated: September 5, 2014 23:32 IST