ओळ : बामणोली इंडस्ट्रीयल असोसिएशनच्या वतीने एमआयडीसीचे उपकार्यकारी अभियंता के. जे. सनदी याना निवेदन दिले. यावेळी अनंत चिमड, सदाशिव मलगान, संजय गुंडपकर, सज्जाद पाकजादे, प्रकाश चौगुले उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
कुपवाड : कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील रस्त्याची सध्या दुरवस्था झाली आहे. या खराब झालेल्या रस्त्याची पाहणी करून त्वरित दुरुस्ती करावी या मागणीसाठी बामणोली (ता. मिरज) येथील इंडस्ट्रीयल असोसिएशनतर्फे एमआयडीसीचे उपकार्यकारी अभियंता के. जे. सनदी यांना निवेदन देण्यात आले. यावेळी त्यांनी कुपवाड एमआयडीसीमधील रस्ते खड्डेमुक्त करू, असे आश्वासन उद्योजकांना दिले.
कुपवाड औद्योगिक वसाहतीमधील रस्त्याची अवस्था सध्या अत्यंत खराब झाली आहे. या खराब रस्त्याकडे एमआयडीसीचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे बामणोली इंडस्ट्रीयल असोसिएशनचे अध्यक्ष अनंत चिमड, उपाध्यक्ष सदाशिव मलगान, संचालक संजय गुंडपकर, सज्जाद पाकजादे, उद्योजक प्रकाश चौगुले यांच्या वतीने उद्योग भवन सांगली येथील एमआयडीसीचे उपकार्यकारी अभियंता सनदी यांच्याकडे उद्योजकांच्या समस्या मांडल्या.
यावेळी सनदी यांनी दोन दिवसात पाहणी करून खराब झालेल्या रस्त्याच्या दुरुस्तीचा प्रस्ताव तयार करून वरिष्ठांकडून परवानगी घेऊन लवकरच कुपवाड एमआयडीसीमधील रस्ते खड्डेमुक्त करू, असे आश्वासन उद्योजकांना दिले. याबरोबरच एमआयडीसीतील बंद असलेली स्ट्रीट लाईट दोन दिवसांत सुरू केली जातील. त्याच्या दुरुस्तीचे काम मंगळवारपासून चालू झाले असल्याची माहिती दिली. तसेच पावसाळ्यानंतर कुपवाड एमआयडीसीमधील सर्व रस्ते पूर्णपणे नूतनीकरण करण्यासाठी प्रस्तावही पाठवला जाईल, असेही त्यांनी सांगितले. त्याचबरोबर उद्योजकांनी आपला कचरा स्ट्रीट लाइटच्या जवळ जाळू नये, असेही त्यांनी सांगितले.