लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : येथील अहिल्यादेवी होळकर चौकाची अत्यंत दुरवस्था झाली असून पडझड झालेल्या आयलँडसह अन्य दुरुस्तीची कामे तातडीने करावीत, अशी मागणी धनगर समाज बहुउद्देशीय संस्थेच्यावतीने गुरुवारी महापौर दिग्विजय सूर्यवंशी यांच्याकडे करण्यात आली.
संस्थेचे प्रदेशाध्यक्ष तानाजी होनमाने यांनी महापौरांसह उपायुक्त राहुल रोकडे यांनाही निवेदन दिले. निवेदनात म्हटले आहे की, सांगली शहरांमध्ये सर्वांत मोठा चौक म्हणून शिंदे मळ्यातील प्रभाग क्रमांक ९ मधील अहिल्यादेवी होळकर चौक ओळखला जातो. या चौकातील आयलँडही शहरातील सर्वांत मोठा आयलँड आहे. तरीही या चौकाच्या देखभाल-दुरुस्तीकडे नेहमीच दुर्लक्ष केले जाते. या ठिकाणच्या बांधकामास ठिकठिकाणी तडे गेले आहेत. अनेकवेळा महापालिकेला निवेदने देऊनही चौक दुरुस्त केला जात नाही.
अहिल्यादेवी होळकरांच्या नावाने उभारलेल्या या चौकातील बांधकामाची दुरुस्ती तातडीने करावी. दुरुस्ती न केल्यास चौकातच उपोषण करण्यात येईल, असा इशारा होनमाने यांनी दिला आहे. यावेळी सुखदेव काळे, सुनीता मदने, विकास हाके, अमोल आटपाडे, सागर कोळेकर आदी उपस्थित होते.