लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : विजयनगर रेल्वे पुलाखालील रस्ता मृत्यूचा सापळा बनलेला आहे. आठवड्यात त्याची दुरुस्ती करावी, अन्यथा रिपब्लिकन स्टुडंट युनियन नागरिकांसह महापालिकेवर मोर्चा काढेल, असा इशारा अमोल वेटम यांनी दिला आहे.
पत्रकात त्यांनी म्हटले आहे की, रेल्वे पुलाखालील रस्ता धोकादायक बनलेला आहे. या रस्त्यावर सांडपाणी, कचरा वाहून येत आहे. त्यामुळे मोठे खड्डे पडून त्या डबक्यात सांडपाणी साठत आहे. लोखंडी सळया बाहेर आल्या आहेत. हाकेच्या अंतरावर नगरसेवक राहत असूनही याकडे जाणीवपूर्वक कानाडोळा केला जात आहे. नागरिकांना, महिलांना, विद्यार्थ्यांना ये-जा करताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. चार नगरसेवक एका वॉर्डमध्ये असूनही एकही कामाचा नाही, अशी जनभावना निर्माण झाली आहे. नागरिक संतप्त आहे. नगरसेवक, महापालिकेचे दुर्लक्ष आहे.
या रस्त्याचा वापर कुपवाड, अष्टविनायकनगर, श्रमिकनगर, विजयनगर परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात करतात. पोलिसांची गस्त, आपत्कालीन सुविधा, शाळा, दवाखाना, शासकीय कार्यालय, जिल्हाधिकारी, कोर्ट परिसर या ठिकाणच्या नागरिकांची येथे नेहमीच वर्दळ असते. या खड्ड्यांमुळे अनेक अपघात झालेले आहेत. अनेक जण जखमी झाले आहेत. याला जबाबदार कोण, अशा प्रश्न उपस्थित होत आहे, येत्या आठवड्यात दुरुस्ती झाली नाही तर रिपब्लिकन स्टुडंट्स युनियनच्या वतीने महापालिकेसमोर भागातील नागरिकांसह आंदोलन छेडण्याचा इशारा अमोल वेटम यांनी दिला आहे.