सांगली : पंतप्रधानांवर टीका करणाऱ्या गृहमंत्री आर. आर. पाटील यांनी स्वत:ची उंची ओळखावी. केवळ भाषणबाजी करण्याचे उद्योग करू नयेत. लोकसभेला त्यांना पक्षाने ताकद दाखवून दिली आहे. पुन्हा ताकदीचे आव्हान त्यांनी देऊ नये, असा इशारा खासदार संजय पाटील यांनी आज, शनिवारी पत्रकार परिषदेत दिला. ते म्हणाले की, लोकसभा निवडणुकीच्या निकालापूर्वी त्यांना मी आव्हान दिले होते. लोकसभा निवडणुकीत कॉँग्रेसचा पराभव झाला, तर त्यांनी राजकारण सोडावे आणि कॉँग्रेसचा विजय झाला, तर आपण राजकारण सोडू, असे आव्हान होते. त्यांनी ते स्वीकारलेच नाही. त्यांना केवळ भाषणबाजी करण्याचाच छंद आहे. लोकसभा निवडणुकीत सर्व विधानसभा मतदारसंघात भाजपला मोठे मताधिक्य मिळाले होते. यापेक्षा वेगळी ताकद दाखवायची काही गरज नाही. तासगाव-कवठेमहांकाळच्या जागेबाबत आमची मागणी आहे. महायुतीमध्ये बरेच घटकपक्ष आहेत. त्यांच्याशी चर्चा करूनच वरिष्ठ नेते याबाबत निर्णय घेतील. सर्वांनीच आपल्या पद्धतीने जागांची मागणी केली आहे. त्यामुळे जो निर्णय होईल, तो स्वीकारण्याची आमची तयारी आहे. जिल्ह्णातील काही नेते भाजपमध्ये येण्याच्या तयारीत आहेत, पण आघाडीबाबत निर्णय होत नाहीत, तोपर्यंत त्यांचेही निर्णय होतील, असे वाटत नाही. भाजपमध्ये उमेदवारी मागण्याचा अधिकार सर्वांना आहे. उमेदवारी मागितली म्हणून पक्षांतर्गत गटबाजी आहे, असे म्हणणे चुकीचे आहे. कोणाला उमेदवारी दिली जावी, याचा निर्णय पक्षच घेणार असल्याने तो सर्वांना मान्य करावाच लागेल. जागावाटपाचा निर्णय अजून होणार आहे. त्यानंतर उमेदवार निश्चित होईल.
आर.आर.नी स्वत:ची उंची ओळखावी
By admin | Updated: July 27, 2014 00:32 IST