करगणी : पालकांनी मुलांना केवळ स्पर्धात्मक शिक्षण देण्यावर भर न देता, संस्कारशील शिक्षण देण्याची गरज आहे, असे प्रतिपादन प्राचार्य डॉ. सयाजीराजे मोकाशी यांनी केले.
आटपाडी तालुक्यातील शेटफळे येथे ध्येयदिशा पेरणी प्रतिष्ठानतर्फे आयोजित व्याखानमालेत डॉ. मोकाशी बोलत होते. यावेळी जलसंपदा विभागातील सहाय्यक कार्यकारी अभियंता प्रगती पाटील यांनी स्पर्धा परीक्षेबाबत मार्गदर्शन केले. वाचन चळवळीचे कार्यवाहक दिनेश देशमुख यांनी युवकांना वाचनाचे महत्त्व सांगितले.
यावळी प्रतिष्ठानतर्फे आयोजित वक्तृत्व व निबंध लेखन स्पर्धांचे बक्षीस वितरण व गावातील गुणवंतांचा सन्मान करण्यात आला. शहाजी गायकवाड व अर्जुन गायकवाड यांनी गुणवंतांना बक्षीस म्हणून रोख रक्कम दिली. राजेश गायकवाड यांनी सर्व स्पर्धकांना प्रेरणादायी पुस्तके भेट दिली.
वक्तृत्व स्पर्धेत प्रथम क्रमांक पंंडित जवाहरलाल नेहरू हायस्कूलची सानिका गायकवाड हिने मिळवला तर निबंध लेखन स्पर्धेत वैष्णवी गायकवाड हिने प्रथम क्रमांकाचे पारितोषिक पटकावले. प्रतिष्ठानचे अध्यक्ष प्रा. संभाजीराव गायकवाड यांनी प्रास्ताविक केले. तनिष्का गायकवाड हिने सूत्रसंचालन केले तर दत्तात्रय कांबळे यांनी आभार मानले.
यावेळी प्रा. चंद्रकांत गायकवाड, रणजित पाटील, रवींद्र गायकवाड, राजाराम घाडगे, पतंगराव गायकवाड, रंजना ठोंबरे, आबासाहेब ननवरे, भास्कर गायकवाड, अशोक पवार, सुचिता गायकवाड, संजय गायकवाड, विजय ननवरे आदी उपस्थित होते.