लाेकमत न्यूज नेटवर्क
कडेगाव : यशवंतराव मोहिते कृष्णा सहकारी साखर कारखान्याच्या निवडणुकीत डॉ. इंद्रजित मोहिते यांच्या रयत पॅनेलच्या प्रचाराची धुरा राज्यमंत्री डॉ. विश्वजित कदम यांनी सांभाळली, तर संस्थापक पॅनेलच्या प्रचारात स्वतः अविनाश मोहिते पुढे होते. यामुळे ही तिरंगी निवडणूक रंगतदार झाली. ‘कृष्णा’तील सत्ताधारी सहकार पॅनेलविरुद्ध लढताना रयत पॅनल आणि संस्थापक पॅनेलची आघाडी होणे अपेक्षित होते. मात्र येथे सभासद मतदारांच्या लोकभावनेचा विचार न करता त्यांना गृहीत धरणाऱ्या सल्लागारांचा आविर्भाव नडला आणि बिघाडी झाली. यामुळे रयत आणि संस्थापक या दोन्ही पॅनेलची मागील निवडणुकीपेक्षा जास्तच पीछेहाट झाली.
कृष्णा कारखान्याच्या सत्तेची सूत्रे पुन्हा सहकार पॅनेलच्या हातात गेली आहेत; पण या निवडणुकीने विरोधी बाजूला अविनाश मोहिते व इंद्रजित मोहिते यांच्यासह कृष्णेच्या राजकारणात विश्वजित कदम नावाचा मोहरा दिला आहे. वास्तविक रयत आणि संस्थापक पॅनल एकत्र येऊन लढले असते तर निवडणूक अटीतटीची झाली असती. मात्र आघाडी न झाल्यामुळे सहकार पॅनेलने एकतर्फी बाजी मारली.
आता डॉ. सुरेश भोसले पुन्हा कृष्णा कारखान्याचे अध्यक्ष होतील; पण तेथील राजकारणातील विरोधी बाजूने अविनाश मोहिते व इंद्रजित मोहिते यांच्यासह डॉ. विश्वजित कदम यांनाही लक्ष घालावे लागणार आहे. या निवडणुकीच्या निमित्ताने कृष्णेच्या सत्ताधाऱ्यांविरुद्ध लढणाऱ्या विश्वजित पर्वाची सुरुवात झाली आहे. विश्वजित कदम हाच एक चेहरा यापुढील कालावधीतही अविनाश मोहिते व इंद्रजित मोहिते यांच्यासह विरोधकांची मोट बांधून सत्ताधाऱ्यांसमोर आव्हान उभे करू शकतो. याचीही जाणीव सत्ताधाऱ्यांना या निवडणुकीच्या निमित्ताने झाली आहे.
चौकट
त्यांच्या वाट्याला पुन्हा संघर्ष
सुरुवातीला अटीतटीची वाटणारी कृष्णेची निवडणूक एकतर्फी झाली असली तरी विश्वजित कदम यांच्या प्रचारसभांमुळे या निवडणुकीला रंग आला. मात्र तरीही रयत पॅनेलची घसरगुंडी थांबविण्यात त्यांना यश आले नाही. याशिवाय अविनाश मोहिते यांच्या संस्थापक पॅनेललाही मागील निवडणुकीइतकी कामगिरी जमली नाही. कृष्णा कारखान्याचे राजकारण हे अनेक वर्षे दोन मोहिते आणि भोसले यांच्याचभोवती फिरत राहिले. हे सत्य असले तरी आता दोन्ही मोहिते पुन्हा सत्तेच्या बाहेर आहेत. यामुळे त्यांच्या वाट्याला पुन्हा संघर्षच आला आहे.