लाेकमत न्युज नेटवर्क
मिरज : मिरजेतील सिनर्जी हॉस्पिटल येथे २० वर्षीय गर्भवती महिलेवर दुर्मीळ शस्त्रक्रिया यशस्वी करण्यात आली. संबंधित महिलेची प्रकृती उत्तम असल्याची माहिती स्रीराेगतज्ज्ञ आणि सिनर्जीचे अध्यक्ष डॉ. रवींद्र आरळी यांनी दिली.
डॉ. आरळी म्हणाले, संबंधित महिला चार महिन्यांची गरोदर होती. तपासणीदरम्यान या महिलेच्या गर्भाशयात/गर्भनलिकेत गर्भ न राहता ताे पोटामध्ये राहिल्याचे दिसून आले. पोटात गर्भ राहणे ही अतिशय दुर्मीळ घटना आहे. यामध्ये महिलेच्या व बाळाच्या जीवाला धोका होण्याची शक्यता असते. यामुळे या महिलेची ताबडतोब शस्त्रक्रिया करण्याचा निर्णय घेतला. स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ. आशा गाझी, कर्कराेगतज्ज्ञ डॉ. श्रीनिकेतन काळे, भूलरोगतज्ज्ञ डॉ. प्रदीप पाटील व डॉ. रिनाज पटेल यांनी यशस्वीपणे ही शस्त्रक्रिया पार पाडली. शस्त्रक्रियेवेळी महिलेच्या पोटात २ लीटर रक्त होते. महिलेच्या आतड्यांना इजा न करता सुखरूपपणे शस्त्रक्रिया करण्यात आली. चिकटलेली वार योग्यरितीने काढण्यात आली. महिलेला ४ बाटल्या रक्त देण्यात आले. सध्या ती सुखरूप असून, तिच्यावर उपचार सुरु आहेत. या दुर्मीळ शस्त्रक्रियेबद्दल हॉस्पिटलचे व्यवस्थापकीय संचालक प्रसाद जगताप यांनी सर्व डॉक्टर्स, कर्मचाऱ्यांचे कौतुक केले.