लाेकमत न्यूज नेटवर्क
कवठेमहांकाळ : तालुक्यातील महिलेच्या ओळखीचा गैरफायदा घेत तिच्यावर बलात्कार केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. याप्रकरणी संदीप वसंत भाेसले (वय ४०, रा. बेघर वसाहत, कवठेमहांकाळ) याच्याविराेधात कवठेमहांकाळ पाेलीस ठाण्यात पीडित महिलेने तक्रार दिली आहे. पोलिसांनी त्याला अटक करून त्याच्याविराेधात ॲट्रॉसिटी व बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे.
संदीप भोसले गुन्हेगारी प्रवृत्तीचा आहे. त्याची मागील पाच वर्षांपासून पीडित महिलेशी ओळख आहे. तिचे पती कामानिमित्त परराज्यात असतात. याचा गैरफायदा घेत संदीपने तिच्याशी ओळख वाढवली. तिचा घराशेजारील कुटुंबाशी वाद हाेता. हा वाद मिटविण्यासाठी संदीपने मध्यस्थी केली हाेती. वाद मिटविण्यासाठी आलेल्या संदीपने रात्री जबरदस्तीने महिलेच्या घरी मुक्काम केला. जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. यानंतर पुन्हा दोन दिवसांपूर्वी संदीपने परत संबंधित महिलेच्या घरी जाऊन जिवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला.
पीडितेने घाबरून कोणाला याबाबत सांगितले नव्हते; पण संदीपचा अन्याय सहन न झाल्याने तिने शुक्रवारी कवठेमहांकाळ पोलिसात धाव घेऊन तक्रार दिली.
या तक्रारीवरून कवठेमहांकाळ पोलिसांनी संदीप भोसले याच्याविरोधात ॲट्रॉसिटी व बलात्काराचा गुन्हा दाखल केला आहे. त्याला अटक करण्यात आली आहे. अधिक तपास विभागीय पोलीस अधिकारी रत्नाकर नवले यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस निरीक्षक जितेंद्र शहाणे करीत आहेत.