लोकमत न्यूज नेटवर्क
सांगली : शहरातील २७ वर्षीय तरुणीवर सहा महिन्यांपासून बलात्कार करून तिचा गर्भपात केल्याची घटना उघडकीस आली. याप्रकरणी सागर प्रकाश कोळेकर (वय २४, श्रीरामनगर, विजयनगर) याच्यावर विश्रामबाग पोलिसांत बलात्काराचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. त्याचा शोध सुरू असून लवकरच त्याला अटक केली जाईल, असे पोलिसांनी सांगितले.
पोलिसांनी माहिती दिली की, पीडिता कुटुंबियांसह सांगलीत राहते. कोळेकरने लग्नाचे आमिष दाखवून तिच्याशी प्रेमसंबंध निर्माण केले. दरम्यान, पीडितेचा डिसेंबर २०२० मध्ये एका तरुणाशी विवाह झाला. संशयित कोळेकरने तिला ‘तू लग्नानंतर पाच दिवसांनी परत ये, आपण दोघे निघून जाऊ’ असे सांगितले. पीडितेला लग्नानंतर परतल्यानंतर कोळेकरने जयसिंगपूर येथे नेले. तेथे बलात्कार केला. नंतर जयसिंगपूर येथे एका ठिकाणी ते भाड्याने राहत होते. भाडे परवडत नसल्याने ते सांगलीत आले. शहरात राहू लागले. तेथेही संशयित कोळेकरने बलात्कार केला. काही महिने हा प्रकार सुरू होता. दरम्यान, पीडितेला दिवस गेले. चार महिन्यांची गरोदर होती. कोळेकरला माहिती सांगितल्यानंतर त्याने ‘हे मूल माझे नाही’ असे म्हणून टाळण्यास सुरुवात केली. तिला गर्भपाताचे औषध घेण्यास लावून गर्भपात केला. अखेर पीडितेने फिर्याद दिली. त्यानुसार कोळेकरविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.