मिरज : शहरात उत्साहात रंगपंचमी साजरी करण्यात आली. शहरातील रस्त्यांवर विविध रंगांचे सडे पडले होते. गल्लीबोळात लहान मुलांनी व तरुण तरुणींनी रंगपंचमीचा आनंद लुटला.
शुक्रवारी सकाळपासून बालचमूंनी रंगांच्या उधळण सुरू केली. बाजारात उपलब्ध पिचकाऱ्या व कोरडे रंगांचा वापर करण्यात आला. तरुण घरोघरी जाऊन रंग लावत होते. चौकाचौकात रंगाची उधळण करण्यात आली. मित्रमैत्रिणींना रंग लावण्यासाठी रंगात न्हालेल्या युवक युवती दुचाकीवरून फिरत होत्या. अनेकांनी कोरड्या रंगांनी रंगपंचमी साजरी केली. तरुणांसोबत ज्येष्ठ नागरिकांनीही मित्र, व परिवारासोबत सण साजरा केला. फेसबुक, व्हॉट्सॲपच्या माध्यमातून रंगपंचमीच्या शुभेच्छा देण्यात आल्या. काेरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता मास्कचा वापर, सोशल डिस्टन्सिंग, याकडे मात्र रंगपंचमीच्या उत्साहात तरुणाईचे दुर्लक्ष झाल्याचे चित्र होते. रंगपंचमीच्या पार्श्वभूमीवर शहरात प्रमुख चाैकात व संवेदनशील ठिकाणी पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला होता.