इस्लामपूर : रेठरेहरणाक्ष (ता. वाळवा) येथील ऊस वाहतूक करणाऱ्या एकाची जत तालुक्यातील ऊस तोडणी मुकादमाने मजूर पुरविण्याचा करार करत ५ लाख ५० हजार रुपयांची फसवणूक केली आहे. जुलै आणि ऑगस्ट २०२० मध्ये ही घटना घडली आहे.
याबाबत भीमराव बिरू कोळेकर (६०, रेठरे हरणाक्ष) यांनी पोलिसात फिर्याद दिली आहे. त्यानुसार सुनील सोपान मंडले आणि सोपान नामदेव मंडले (दोघे रा. डोंगरसोनी, ता. जत) यांच्याविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा नोंद करण्यात आला आहे. ९ जुलै ते १८ ऑगस्ट २०२० या कालावधीत ही फसवणूक झाली आहे.
कोळेकर हे राजारामबापू कारखान्यासाठी स्वतःच्या वाहनातून ऊस वाहतूक करतात. त्यांनी मंडले बाप-लेकाशी १४ ऊस तोडणी मजूर पुरविण्याचा करार केला होता. त्यावेळी उचल म्हणून ५० हजार रुपये कोळेकर यांनी मंडले याला दिली.
ऊस तोडणी मजुरांच्या प्रत्येक जोडीसाठी ८० हजार रुपये या दराने एकूण ५ लाख ५० हजार रुपयांचा करार करण्यात आला होता. त्याप्रमाणे कोळेकर यांनी २२ जुलैला ३ लाख आणि १८ ऑगस्टला २ लाख रुपये अशी एकूण सर्व ठरलेली रक्कम दिली. त्यानंतर हंगाम सुरू झाला तरी मंडले यांनी ऊस तोडणी मजूर पुरविले नाहीत. त्यामुळे कोळेकर यांनी पैशाची मागणी केली. तेव्हा मंडले हा उडवाउडवीची उत्तरे देऊ लागला. या सर्व प्रकारात आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यावर कोळेकर यांनी पोलिसात धाव घेतली.