फोटो: आष्टा येथे उद्योगपती रामप्रताप झंवर यांना श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी डॉ. मनोहर कबाडे, समीर गायकवाड, दीपक साठे, बाबासाहेब सिद्ध, सूर्यकांत जुगदर आदी उपस्थित होते.
लोकमत न्यूज नेटवर्क
आष्टा : रामप्रताप झंवर हे उद्योगशील व्यक्तिमत्त्व होते. अतिशय खडतर व प्रतिकूल परिस्थितीमध्ये जिद्द व चिकाटीच्या जोरावर त्यांनी झंवर ग्रुप ऑफ इंडस्ट्रीचा वटवृक्ष उभा केला. या वटवृक्षाच्या माध्यमातून हजारो बेरोजगारांना रोजगाराची संधी निर्माण केली असे प्रतिपादन डॉ मनोहर कबाडे यांनी केले.
आष्टा येथे जायंट्स ग्रुपच्या वतीने नगरीचे भूषण दिवंगत उद्योगपती रामप्रताप झंवर यांना शोकसभेत श्रद्धांजली वाहण्यात आली. यावेळी ते बोलत होते.
समीर गायकवाड म्हणाले, रामप्रताप झंवर अतिशय व्यासंगी व धार्मिक वृत्तीचे होते. आष्टा नगरीच्या विकासामध्ये त्यांचे भरघोस योगदान राहिलेले आहे. आष्ट्यासारख्या निमशहरी गावांमध्ये आष्टा लाइनर्स व कस्तुरी फाउंड्री सुरू करण्याचे धाडस त्यांनी केले व ते यशस्वी करून दाखवले. आष्टा शहराच्या विकासात आज या इंडस्ट्रीचे मोठे योगदान आहे.
यावेळी उद्योगपती दीपक साठे, आष्टा शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष प्रकाश रुकडे, उद्योगपती महावीर थोटे, आष्टा पीपल्स बँकेचे सेवानिवृत्त मुख्य कार्यकारी अधिकारी सुरेश चौगुले, गणेश नागरी सहकारी पतसंस्थेचे अध्यक्ष रामनारायण उंटवाल,एन. डी. कुलकर्णी, माजी उपनगराध्यक्ष बाबासाहेब सिद्ध यांनी रामप्रताप झंवर यांच्या आठवणींना उजाळा दिला.
माजी उपनगराध्यक्ष रघुनाथ जाधव, प्रा. सूर्यकांत जुगदर, मुकुंद इंगळे, प्रभाकर जाधव, उद्योगपती प्रशांत घाडगे, डॉ. अनिल निर्मळे, प्रा दत्तात्रय सोकाशी, धनपाल चौगुले, प्रा. नंदकुमार तोडकर उपस्थित होते.